Latest

भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना अटक, तरुणीला जिभेने फरशी साफ करायला लावली

दीपक दि. भांदिगरे

रांची : पुढारी ऑनलाईन; रांची पोलिसांनी (Ranchi police) बुधवारी भाजपच्या निलंबित नेत्या आणि माजी आयएएस अधिकारी महेश्वर पात्रा यांची पत्नी सीमा पात्रा (Seema Patra) यांना अटक केली. मोलकरणीचा छळ केल्याप्रकरणी (torturing maid) त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरगोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सरकारी कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, रांची पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी एका माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून एका २९ वर्षीय तरुणीची सुटका केली होती. तिचा शारीरिक छळ करण्यात आला होता. या प्रकरणी मंगळवारी तिचा जबाब दंडाधिकार्‍यांसमोर नोंदवण्यात आला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीमा पात्रा यांनी त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या मुलीला क्रूरपणे मारहाण केली आणि त्रास दिला, असे एनसीडब्ल्यूने म्हटले आहे. सदर आदिवासी दिव्यांग मुलीला आठ वर्षे घरात डांबून ठेवून भयंकर छळ केल्याचे समोर आले आहे. रॉडने मारून तिचे दात तोडले होते. कधी कधी गरम तव्याचे चटके देण्यात आले. मुलीच्या चेहर्‍यावर अजूनही जखमा आहेत.

महेश्‍वर आणि सीमा पात्रा दाम्पत्य रांचीतील अशोकनगरमध्ये राहते. पीडित मुलगी सुनीता ही गुमला येथील रहिवासी आहे. पात्रा दाम्पत्याला दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर सुनीता १० वर्षांपूर्वी घरकामासाठी दिल्लीला गेली. सहा वर्षांपूर्वी रांचीला परतली. तिला काम सोडायचे होते. पण तिला आठ वर्षे डांबून ठेवण्यात आले. अखेरच्या दिवसांत सुनीताला चालता येत नव्हते. आजारी असताना लघवी झाल्यानंतर पात्रा दाम्पत्याने सुनीताला जिभेने फरशी साफ करायला भाग पाडल्याचेही समोर आले आहे.

विवेक आनंद बस्के नावाच्या एका शासकीय कर्मचार्‍याला सुनीताने या अत्याचाराची माहिती दिली. त्यावरून आरगोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रांची पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने या २९ वर्षीय तरुणीची सुटका केली. सीमा या 'बेटी बचाओ – बेटी पढाओ' अभियानाच्या राज्य समन्वयक होत्या, हे विशेष! भाजपमध्ये पदाधिकारीही होत्या. प्रकरण समोर आल्यानंतर सीमा पात्रा यांची भाजपने हकालपट्टी केली आहे. पात्रा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पात्रा यांच्या अटकेची मागणी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने पात्रा यांना निलंबित केले होते. राज्यपाल रमेश बैस यांनीही संबंधित भाजप महिला नेत्यावर कारवाई का करण्यात आली नाही, अशी विचारणा मंगळवारी डीजीपी नीरज सिन्हा यांच्याकडे केली होती.

सदर महिलेवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध आदिवासी संघटनांच्या सदस्यांनी मंगळवारी राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) ला भेट देऊन तिच्या तब्येतीची विचारपूस केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT