कोझिकोड, वृत्तसंस्था : केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह विषाणूचा सहावा रुग्ण आढळल्यानंतर 24 सप्टेंबरपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, निपाह व्हायरसची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या 1008 वर पोहोचली आहे. यापैकी 327 आरोग्य कर्मचारी आहेत. कोझिकोड जिल्ह्याबाहेरील 29 लोक बाधितांच्या संपर्कात आले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये मलप्पुरममधील 22, वायनाडमधील 1 आणि कन्नूर-थ्रिसूर जिल्ह्यातील प्रत्येकी 3 इतक्या लोकांची ओळख पटली आहे.
कोझिकोडमध्ये निपाहमुळे पहिला मृत्यू 30 ऑगस्टला, तर दुसरा मृत्यू 11 सप्टेंबरला झाला होता. 30 ऑगस्ट रोजी मृतांच्या अंत्यसंस्कारात 17 जण सहभागी झाले होते. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. निपाहच्या 4 सक्रिय रुग्णांमध्ये एका 9 वर्षांच्या मुलाचाही समावेश असून, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.