Latest

पिंपरी : पालिकेची शाळा भरते पत्राशेडमध्ये, धोकादायक इमारतीतून शाळेचे स्थलांतर

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील शाळेची इमारत दोन ते तीन वर्षांपूर्वी धोकादायक ठरविण्यात आली होती. शाळेतील सामानाचे व विद्यार्थ्यांचे नुकतेच चिंतामणी चौक येथील जागेत पत्राशेडमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यास एक, दीड वर्षाचा तरी कालावधी लागणार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना आता अपुर्‍या जागेत बसून अभ्यास करावा लागणार आहे.

शाळेची इमारत होती धोकादायक

ही शाळा दोन सत्रात भरविण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवड नगरपालिका असताना 1978 मध्ये वाल्हेकरवाडीची शाळा बांधण्यात आली. तेव्हा जेमतेम चार खोल्या होत्या. पुढे त्याची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. शाळेची सध्याची जुनी इमारत अपुरी पडते आहे. शाळेच्या दोन्ही बाजूने वाहतुकीचे रस्ते असून शाळा मध्यभागी आहे. त्यामुळे अशी धोकादायक परिस्थिती होती. चाळीस वर्षांहून अधिक काळाची इमारत असल्यामुळे पालिकेच्या स्ट्रक्चर ऑडिटमध्येच वाल्हेकरवाडीची शाळा धोकादायक ठरविण्यात आली.

यानंतर वाल्हेकरवाडी शाळेचे बाहेरच छतदेखील एकदा कोसळले होते. यावर इमारतीची तात्पुरती डागडुजी करून अशा धोकादायक शाळेतच विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांवर धोक्याची टांगती तलवार असून कधीही काहीही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती होती. शाळेचे ऑगस्ट महिन्यातच स्थलांतर होणार होते; मात्र स्थापत्य विभागाची परवानगी न मिळाल्याने एक महिना उशिरा स्थलांतर करण्यात आले आहे.

अपुर्‍या सुविधा, पण विद्यार्थी सुरक्षित

आमच्या मुलांवर धोक्याची टांगती तलवार होती. पण पत्राशेडमध्ये अपुरी जागा का असेना, आमची मुले सध्या सुरक्षित आहेत. शाळेत आणायला, सोडायला आम्हाला लांब पडते, पण याची सवय होईल. नवीन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत थोडासा त्रास सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया पालकांनी या वेळी दिली.

पर्यायी इमारतीचे काम संथगतीने

शाळेची इमारत धोकादायक ठरविल्यानंतर वाल्हेकरवाडीतील चिंतामणी चौकात शाळेसाठी पर्यायी इमारत बांधण्याचे काम सुरू झाले; मात्र ते अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पर्यायी जागेवर तात्पुतरे पत्राशेड बांधून याठिकाणी अपुर्‍या जागेत शाळा सुरू आहे. पत्राशेडमध्ये अपुर्‍या जागेमुळे विद्यार्थ्यांना बसण्यास बाके नाहीत. फॅन आहेत, मात्र, उन्हाळ्यात पत्राशेडमध्ये विद्यार्थी कसे शिक्षण घेणार, हा प्रश्न आहे.

SCROLL FOR NEXT