Latest

आभार माना! ‘ते’ गेल्याने तुमचे प्रमोशन ; जयंत पाटील यांचा टोला

अमृता चौगुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  मागील वर्षी याच व्यासपीठावरून विचाराचे धन दिले गेले होते. त्यानंतर पक्ष फोडला. त्या वेळी जे दिग्गज होते, ते गेले. त्यामुळे मागील रांगेतील आता पुढे आले. आता तुमचे प्रमोशन झाले, नाहीतर तुम्हाला संधी मिळाली नसती. गेलेल्यांचे आभार माना, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत टोला हाणला. 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' अशी टॅगलाईन असलेले राष्ट्रवादीचे दोन दिवसांचे शिबिर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज शिर्डीत सुरू झाले. त्या वेळी प्रास्ताविक करताना जयंत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, की नवीन वर्षाची सुरुवात, झाले गेले मागे टाकून नव्याने करत असतो. या दोनदिवसीय शिबिरातून लोकशाहीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र भारतात गरज असल्याची जाणीव होईल. परिस्थिती सकारात्मक आहे. सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटविली. त्यांची जयंती, हा विलक्षण योगायोग आहेे. समतेचा विचार देशात टिकावा यासाठी शिबिराची ज्योत सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे. फुले यांनी संघर्षाच्या काळात संघर्ष केला. विरोध होतानाही फुलेंचे कार्य सुरूच होते. भविष्यात आपल्यापुढेही निवडणुकांचे वर्ष, संघर्षाचा काळ आहे. मात्र वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे.

शरद पवारांची साथ न सोडता काम करायचे आहे, असे सांगून पाटील म्हणाले, की फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार आपण मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची, फुलेंनी ज्ञानाची, होळकर यांनी अस्मितेची, शाहूंनी समतेची ज्योत पेटविली. घटनेच्या चौकटीत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बसविले. पुरोगामी विचारांची ज्योत पेटवायची आहे. समोरच्या बाजूने जाहिराती प्रचंड असल्याने आपले कोणीच ऐकत नाही असे नाही. लोक ऐकतात. शरद पवारांचे विचार तळागाळात पोहोचवा. सत्ताधार्‍यांच्या चुका, महागाई, बेकारी या गोष्टी जनतेसमोर मांडा, जनतेपर्यंत पोहोचा. जनता सुज्ञ आहे, विचार करते, असे पाटील यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबाही त्यांनी जाहीर केला.

अमोल कोल्हे, डरने की बात नही!
ज्या छत्रपतींचा विचार तळागाळात खा. अमोल कोल्हेंनी पोहोचविला त्यांना पराभूत करण्याचा विडा 'त्यांनी' उचलला; पण जोपर्यंत छत्रपती, भवानीमातेचा आशीर्वाद आहे, अमोल कोल्हे, 'डरने की बात नही.' पक्ष पाठीमागे उभा असल्याचे कोल्हेंना सांगत जयंत पाटील यांनी अजित पवारांना डिवचले.

रोहित पवारांची अनुपस्थिती
आ. रोहित पवार यांची शिबिरातील अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. मात्र आ. पवार यांनी 'एक्स'वरून स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही, याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये.

SCROLL FOR NEXT