Latest

सावंतवाडी : दीपक केसरकरांच्या रक्तातच कृतघ्नता! विनायक राऊत यांची टीका

backup backup

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : पक्ष बदलूंना पालकमंत्री केले, गृह, अर्थराज्यमंत्री केले. आम्ही, उपाशी राहिलो. पण, तुम्हाला खायला घातले. कृतघ्नता ज्यांच्या रक्तात आहे… ते म्हणजे दीपक केसरकर, असा जोरदार हल्लाबोल करत खासदार आणि महाविकास आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केसरकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. सावंतवाडी येथे संस्थानाचे ग्रामदैवत श्री देव पाटेकराचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला.
यावेळी खा. राऊत यांनी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात प्रचार करण्यापूर्वी राजघराण्यातील देव पाटेकराचे दर्शन मी घेतो. भारतमातेच्या रक्षणासाठी आम्हाला ताकद दे व निवडणुकीत यश दे अशी प्रार्थना, मी श्री देव पाटेकराकडे केली असल्याचे ते म्हणाले.

'सत्ता असतानाही खा. राऊत साधे मंत्री होऊ शकले नाहीत!' अशी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. या टीकेला खा.राऊत यांनी उत्तर दिले. विरोधकांच्या टीकेला मी जास्त किंमत देत नाही. 'गिरेे तो भी टांग उपर' अशी त्यांची अवस्था आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट हल्ला चढवला ते म्हणाले, त्यांच्यासारख्या पक्ष बदलूंना पक्षप्रमुखांनी पालकमंत्री केले,अर्थराज्यमंत्री केले. त्यासाठी आम्ही उपाशी राहिलो पण तुम्हाला खायला घातले. मात्र, खालेेल्या ताटात घाण करणारी तुमची अवलाद आहे. त्यामुळे आमच्यावर बोलायचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. सत्तेसाठी दीपक केसरकर किती लाचार व कृतघ्न होतात हे अवघ्या महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिले आहे. 'कृतघ्नता ज्यांच्या रक्तातच आहे ते दीपक केसरकर' असा जोरदार टोला त्यांनी राऊतांनी हाणला.

रत्नागिरी येथे महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना केलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे केवळ आटापिटा होता. उन्हात तापणार्‍या महिला शिव्या घालत होत्या. दोन किलोमीटरपर्यंत तापलेल्या रस्त्यावरून चालत गेल्याने त्यांच्या पायाला फोड आले. मात्र इंडिया आघाडीचे विराट दर्शन व कालचे केविलवाणे दर्शन यातून आमचा विजय निश्चित आहे. आपणाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे किमान अडीच लाखांचे मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जान्हवी सावंत, शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, रूची राऊत, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, समीर वंजारी, बाळा गावडे, शब्बीर मणियार, रमेश गांवकर, शैलेश गवंडळकर, सावली पाटकर, अ‍ॅड. सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, काशिनाथ दुभाषी, समिरा खलिल, आदी महाविकास आघाडीची पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित
होते.

यानंतर खा.राऊत यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

शहरात ठिकठिकाणी पदाधिकार्‍यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यामध्ये उद्धव बाळासाहेब शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकार्‍यांचा समावेश होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT