Latest

देशी अंडी विकून झाला लखपती! पुण्याच्या सौरभचा थक्क करणारा प्रवास

अमृता चौगुले

पुणे : ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि मेहनत असेल तर सर्वच गोष्टी शक्य होतात. असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. नशीबही अशा लोकांना साथ देते. त्यातच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने व्यवसाय करून यश मिळवल्याचा घटना विरळच. परंतु याला अपवाद ठरलाय सौरभ तापकीर. सौरभ ने आपल्या मेहनतीच्या जोरावर अंडी विक्री व्यवसायात प्रचंड यश मिळवलं आहे. यादरम्यान त्याने अनेक खडतर समस्यांना तोंड दिले. परंतु जिद्दीच्या जोरावर मात करीत त्याने आपला व्यवसाय उभा केला आहे. चला, तर मग जाणून घेऊयात सौरभच्या जिद्दीची गोष्ट.

सौरभची घरची परिस्थिती बेताची त्यामुळे शिक्षण घेणेही त्याच्यासाठी अवघडच होत. तरीही मोठ्या कष्टानं वडिलांनी त्याला नातेवाईकांकडे शिक्षणासाठी पाठवलं. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याची खेळातील आवड शिक्षकांना भावली. शरीर सांभाळण्यासाठी देशी अंडी खाणं खूप महत्वाचं असल्यामुळे शिक्षकांनी त्याला देशी अंडी खायला सांगितलं. देशी अंडी खाण्यापासून सुरु झालेला प्रवास आज रोज १ लाख अंडी विकण्यापर्यंत येऊन पोहचला आहे.

पुण्यात नातेवाईकांकडे राहणाऱ्या सौरभला अंडी खाण्याची सवय होती, मात्र पुण्यासारख्या ठिकाणी देशी अंडी मिळणं खूप कठीण. त्यामुळे त्याने वडिलांना सांगितलं माझ्यासाठी गावावरून अंडी पाठवून द्या. पण वडील म्हणाले, खेडेगावात गेल्याशिवाय अंडी मिळत नाहीत. अंड्यासाठी खेडेगावात सारखं सारखं जाणं शक्य नाही. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या मित्राकडून एक देशी कोंबडी आणून दिली. वडिलांनी त्याला सांगितलं, तू कोंबडी पाळ, खायला घाल आणि जी काय अंडी निघतील ती तू खात जा.

येथून त्याचा प्रवास सुरु झाला. अचानक एक दिवस कोंबडीने अंड देणं बंद केलं. मात्र त्याला काहीच कळत नव्हतं कोंबडी अशी एका जागेवर का बसतेय म्हणून त्याने वडिलांना विचारलं आणि त्यांनी त्याला सांगितलं तू जी अंडी खातोय ती अंडी न खाता कोंबडीखाली जर ठेवली, तर त्यामधून पिल्लं निघतील. पण त्याच्यासाठी ही गोष्ट नवीन होती. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्याने अंड खायचं दिल सोडून आणि ती अंडी कोंबडीखाली ठेवायला सुरुवात केली.

असं करत करत एक कोंबडी म्हणता म्हणता शंभर कोंबड्या कशा झाल्या ते कळलं पण नाही. सौरभला ते नवीन दिसलं म्हणून तो करत गेला. त्यानंतर लोकांना माहीत झालं की सौरभकडे देशी कोंबड्यांची अंडी मिळतात. त्यामुळे त्याच्याकडे खूप लोक यायला लागली, पण तो देत नव्हता. तुमच्यासाठी ते एक अंड आहे, पण माझ्यासाठी ते एक पिल्लू आहे. मात्र कालांतराने त्याच्याकडे जास्त लोकं यायला लागली. त्यावेळेस त्याने लोकांना विचारलं की या अंड्याना एवढी मागणी का आहे. मग त्यांनी त्याला अंड्याचं महत्व सांगितलं. तेव्हापासून सौरभने विचार केला की, एक अंड्याचे दहा रुपये मिळतात. तर दहा अंडी विकली तर शंबर रुपये मिळतील. तेव्हापासून त्याने अंडी विकायला सुरुवात केली.

मामाच्या अंगणामध्ये हा सर्व प्रकार चालू होता. हळूहळू त्याला ते कळत गेलं की, देशी अंड्याना मागणी भरपूर आहे. त्यामुळं त्याने व्यवसाय वाढवायचा निर्णय घेतला. सौरभने मित्र आणि मामाच्या मदतीने परत १०० कोंबड्यापासून प्रवास सुरु केला आणि तो पोहचला १००० कोंबड्यांपर्यत. पुढे हे पण गावरान अंड्याचं उत्पादन कमी पडायला लागले, पण त्याला हे एकट्याला शक्य नसल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहचून त्यांना देशी कुकुटपालन व्यवसायाचे महत्व सांगत महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ दोन हजार कुकुटपालन फार्म चालू केले. त्याने या फार्ममधून अंडी घेण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या व्यवसायाचे ब्रॅण्डिंग करून पुण्यासोबतच मुंबईतही सोसायटीमध्ये जाऊन लोकांना पुरवतो. दिवसाला पन्नास देशी अंडी विक्रीचा सौरभचा हा प्रवास आत्ता पन्नास हजार अंड्यापर्यंत पोहचला आहे.

सध्या मी पुणे आणि मुंबई या दोनच शहरामध्ये देशी अंडी पुरवत असून माझा येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यातील मुख्य शहरांमधील प्रत्येक सोसायटीमधील लोकांपर्यंत देशी अंडी पोहचवण्याचे नियोजन आहे.

– सौरभ तापकीर

SCROLL FOR NEXT