पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रेंच स्ट्रायकर किलियन एम्बाप्पेच्या (Kylian Mbappe) भवितव्याने नाट्यमय वळण घेतले आहे. सौदी अरेबियाचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब अल हिलालने या विश्वविजेत्या खेळाडूला विकत घेण्यासाठी विक्रमी 2700 कोटी रुपयांची (332 मिलियन डॉलर) ऑफर दिल्याचे समोर आले आहे. अल हिलालने यापूर्वी लिओनेल मेस्सीला आपल्या क्लबशी जोडण्याचा प्रयत्न केला होता, पण तो करार यशस्वी झाला नाही. त्यामुळे आता सौदी क्लबने एमबाप्पेला (Kylian Mbappe) विकत घेण्याची योजना आखली असून त्यासाठी कंबर कसली आहे.
दरम्यान, हिलालच्या ऑफरला फ्रेंच खेळाडू कसा प्रतिसाद देतो हे पाहण्यासारखे आहे. पण जर दोघांमधील करार यशस्वी झाल्यास एम्बाप्पे हा क्लब फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल यात शंका नाही. त्यामुळे या कराराकडे अवघ्या जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच एम्बाप्पे (Kylian Mbappe) ही ऑफर स्विकारेल की युरोपमधील इतर कुठल्या क्लबशी जोडला जाईल हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.
एम्बाप्पे (Kylian Mbappe) सध्या फ्रान्समधील पॅरीस सेंट जर्मन (पीएसजी) क्लबकडून खेळत आहे. त्याचा पीएसजीसोबतचा करार 2024 मध्ये संपुष्टात येणार असून या कराराचे नूतनीकरण होणार नसल्याची माहिती सातत्याने पुढे येत आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या क्लब हंगामात तो कुठल्या संघातून खेळेल याची उत्सुकता चाहत्यांना आतापासूनच लागली आहे. अशातच 24 वर्षीय फ्रेंच स्टायकरला आपल्या क्लबशी जोडायला जगभरातील संघ मालक पुढे सरसावल्याचे चित्र आहे.
एम्बाप्पेचे (Kylian Mbappe) वर्तमान बाजार मूल्य 94.8 मिलियन युरो ते 157.9 मिलियन युरो दरम्यान असल्याचा अंदाज आहे. मात्र सौदीचा क्लब अल हिलाल 300 मिलियन युरो मोजून एम्बापेला आपल्या संघात घेण्यास सज्ज झाल्याची चर्चा आहे. पीएसजीनेही या ऑफरबाबत पुष्टी केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे अल हिलालसोबतचा करार यशस्वी झाल्यास एम्बापे हा क्लब फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरणार आहे.
यापूर्वी पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला सौदी क्लब अल-नासरने डिसेंबर 2022 मध्ये अडीच वर्षांसाठी सुमारे 1800 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले होते. पण आता अल हिलाल आणि एमबाप्पे यांच्यातील करार यशस्वी झाल्यास एम्बापेला रोनाल्डोपेक्षा 900 कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. 2022 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत एम्बाप्पेने शानदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत 8 गोल केले. अंतिम फेरीत त्याने 3 गोल केले, पण मेस्सीच्या अर्जेंटिनाविरुद्ध तो फ्रान्सला विजेतेपद पटकावून देऊ शकला नाही. असे असूनही त्याने गोल्डन बूट पुरस्कार मोहोर उमटवली.
फ्रेंच चॅम्पियन पॅरिस सेंट-जर्मेन (PSG)ने एम्बापेला सौदी क्लबकडून मिळालेल्या ऑफरची पुष्टी केली असून अल हिलाल एम्बाप्पेशी थेट चर्चा करू शकतो असे खुद्द पीएसजी सांगितले आहे. 2018 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या एमबाप्पेचा पीएसजीसोबत वाद सुरू आहे. एम्बापेनेही 12 महिन्यांच्या मुदतवाढीचा पर्याय न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, आगामी हंगामाच्या शेवटी 'फ्री एजंट' बनण्याची त्याची योजना आहे. त्यामुळे तो दिग्गज स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदमध्येही सामील होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
युरोपियन फुटबॉल जगतातील बडे खेळाडू सौदी अरेबियातील क्लबशी करारबद्ध होत आहेत. यात रोनाल्डो, करीम बेंझेमा, एन'गोलो कांते आणि रॉबर्टो फिरमिनो यांचा समावेश आहे. मेस्सीलाही मोठी ऑफर देण्यात आली होती पण त्याने सौदी क्लब ऐवजी अमेरिकेतील इंटर मियामी या क्लबची निवड केली. आता पुन्हा एकदा सौदी क्लब अल हिलाल ॲक्टीव्ह झाला असून युरोपियल लिग मधील सर्वोत्तम खेळाडू असणा-या एम्बाप्पेला खरेदी करण्यास सरसावला आहे.