नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाचे युवा नेते तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. १२) असून यंदाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन सत्यशील शेरकर यांच्या मित्र वर्गाने सुरू केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार शनिवारी (दि. १३) विघ्नहर कारखान्यावर सकाळी १० वाजता एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. यावेळी विघ्नहरचे अध्यक्ष सतीश शेरकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा देखील आयोजित केला आहे. या मेळाव्यात खा. शरद पवार काय घोषणा करणार याकडे जुन्नर तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
जुन्नर तालुक्यात सर्वत्र सत्यशील शेरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या आशयाचे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत. धामणखेड येथील कुलस्वामी खंडेरायाच्या पायथ्याशी तीन दिवस बैलगाडा शर्यतीचा आयोजन केला असून सुमारे १० लक्ष रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खा. शरद पवार आणि विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचे चांगलेच सूत जुळल्याचे पाहायला मिळत आहे.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा कल अजित पवार यांच्या गटासोबत असल्यामुळे खा. शरद पवार जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी एका कोऱ्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. सत्यशील शेरकर यांच्या रूपाने जुन्नर विधानसभेसाठी त्यांना आयता उमेदवार मिळाला आहे. सत्यशील शेरकर यांचा पक्ष काँग्रेस जरी असला आणि जुन्नरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने ऐनवेळी सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन विधानसभेचे उमेदवार घेऊ शकतात किंवा शरद पवार जुन्नरची जागा काँग्रेस पक्षालाही सोडू शकतात, अशी शक्यता आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रामुख्याने शेतकरी वर्ग शरद पवारांवर मोठ्या प्रमाणात प्रेम करतात. सत्यशील शेरकर यांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांच्या निधनानंतर विघ्नहर कारखाना अतिशय पारदर्शकपणे चालवल्यामुळे शेतकरी वर्गाचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे २०२४ ची उमेदवारी शरद पवार यांनी सत्यशील शेरकर यांना दिली तर शेरकर हे सहज निवडून येऊ शकतात, असा दावा सत्यशील शेरकर यांच्या समर्थकांचा आहे. त्यामुळेच शनिवारी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यातील आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न सत्यशील शेरकर करू शकतात. शरद पवारांच्या उपस्थित होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला शेतकरी व युवकांची मोठी गर्दी पाहायला मिळू शकते.
शरद पवार विघ्नहर कारखान्यावर आल्यावर शेतकरी मेळाव्यामध्ये काय भाष्य करतात? सत्यशील शेरकर यांची उमेदवारी जाहीर करणार का? याबाबत इतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळतात. शरद पवारांची साथ, काँग्रेसचा हात व सत्यशील शेरकर यांना मिळत असलेल्या तरुण आणि शेतकरी वर्ग यांचा असलेला मोठा पाठींबा यामुळे जुन्नर तालुक्याचा आमदार होण्याचा मान सत्यशिल शेरकर यांना सहज मिळू शकतो, असा दावा शेरकर समर्थक करीत आहेत.
शरद पवारांना मिळाला तगडा गडी
विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीनंतर होणार असल्या तरी जुन्नर तालुक्यामध्ये सत्यशील सरकार यांच्या रूपाने शरद पवार यांना एक चांगल्या तगडा तरुण होतकरू उमेदवार मिळणार असल्यामुळे शरद पवार यांच्या गोटात देखील समाधान आहे.