Latest

Satwik Rankireddy & Chirag Shetty : वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विक-चिराग जोडीने रचला इतिहास, पदक निश्‍चित

रणजित गायकवाड

टोकियो, वृत्तसंस्था : भारताची पुरुष दुहेरीची जोडी सात्त्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्‍चित केले आहे. त्यांनी जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. आता जपानच्या जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या जोडीचा त्यांच्याच मायभूमीत पराभव करत या जोडीने आपल्या दमदार कामगिरीचा डंक्‍का पुन्हा एकदा वाजवला.

चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रेड्डी यांनी जपानच्या जोडीचा 24-22, 15-21, 21-14 असा पराभव केला. हा जबरदस्त सामना 1 तास 15 मिनिटांपर्यंत रंगला. विशेष म्हणजे, सात्त्विकसाईराज आणि चिराग ही बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली पुरुष जोडी ठरणार आहे. भारताचे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्‍विनी पोनप्पा यांनी 2011 मध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले होते.

स्पर्धेत यापूर्वी भारताची जोडी एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांना पराभव सहन करावा लागला. त्यांचा तीनवेळा सुवर्णपदक जिंकणारी जोडी मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेतिआवान यांनी उपांत्यपूर्व फेरीत 8-21, 14-21 असा पराभव केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT