Latest

सातारा : स्व. मदनअप्पांच्या नातवाचे आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात बंड; विजयसिंह शरद पवारांसोबत

दिनेश चोरगे

वाई; पुढारी वृत्तसेवा :  माजी मंत्री स्व. मदनराव पिसाळ यांचे नातू विजयसिंह पिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मदनआप्पांच्या नातवानेच आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात बंड केल्याने वाई मतदारसंघात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मदनआप्पांच्या घरात दुफळी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

माजी मंत्री मदनअप्पा पिसाळ यांचे चिरंजीव व वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गटात आहेत. त्यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांची भूमिका मात्र आजही गुलदस्त्यात आहे. असे असताना त्यांचे चिरंजीव व मदनअप्पांचे नातू विजयसिंह पिसाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. लवकरच शरद पवारांच्या उपस्थितीत वाईत भव्य मेळावा?घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विजयसिंह पिसाळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून माजी मंत्री स्व.मदनराव पिसाळ आप्पा हे खा. शरद पवार यांच्यासोबत होते. आमच्या कुटुंबावर व वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यावर शरद पवारांनी भरभरून प्रेम केले व ताकद दिली आहे. स्व. आप्पांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षे वाई मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांची निष्ठा पाहून शरद पवार यांनी आप्पांना मंत्री हे पद सुद्धा दिले. या कालखंडा दरम्यान शरद पवार यांच्या पाठिंब्यांच्या जोरावर नागेवाडी धरण तसेच सहकारी सूतगिरणीची उभारणी केली. खंडाळा तालुका सुजलाम सुफलाम करण्यात महत्वाची भूमिका निभावली. यामुळे बावधन आणि आसपासच्या गावातील जमीन ओलिताखाली आली. स्व. आप्पांच्या माघारी वडीलकीचा हात शरद पवार यांनी आमच्या कुटुंबाच्या डोक्यावर ठेवला. पिसाळ कुटुंबाची निष्ठा पाहून सौ. अरुणादेवी पिसाळ यांना जि. प.चे अध्यक्ष पद दिले. आमच्या सारख्या सामान्य कुटुंबाला एवढं मोठं केलंत, प्रेम दिलंत, आपुलकी दिली, आदर दिला मग आणखी काय हवं असतं, असेही विजयसिंह पिसाळ यांनी सांगितले.

आमच्या कुटुंबाने कधीही सत्तेसाठी राजकारण केले नाही किंवा निष्ठेशी तडजोड केली नाही. आम्ही सदैव शरद पवार यांच्या विचारांसोबतच चालत आलो आहोत. सातारा जिल्ह्याचे राजकारण हे यशवंत विचारांचे राजकारण असून या विचारांपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. तत्त्व व निष्ठा याबाबत आम्ही कधीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत आणि स्व. आप्पांनी आणि तात्यांनी दाखवलेल्या वाटेवरच आम्ही राहणार आहोत, असेही विजयसिंह म्हणाले.विजयसिंह पिसाळ यांनी आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात घेतलेली जाहीर भूमिका त्यांचे आ. मकरंद पाटील यांच्या विरोधात बंड मानले जात आहे.

मदनअप्पा व लक्ष्मणतात्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागतच केले असते…

स्व. मदनराव आप्पांनी रुजवलेल्या विकास व वैचारिक वटवृक्षाच्या मुळ्या या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या, अबालवृद्धांच्या रुपाने रुजलेल्या आहेत. या भाग्यविधात्याच्या वटवृक्षाची सावली पुन्हा तालुक्यात पसरावी हीच प्रत्येक सर्वसामान्य लोकांची मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही पुन्हा लढू आणि जिंकू. मला एवढी खात्री आहे की आज जर आपल्या सर्वांमध्ये स्व.मदनआप्पा आणि स्व. लक्ष्मणतात्या असते तर त्यांनी सुद्धा माझ्या निर्णयाचे स्वागतच केले असते, असेही विजयसिंह पिसाळ म्हणाले.

SCROLL FOR NEXT