Latest

सातारा जिल्ह्यात मंत्रिपदांच्या नावांचा धुमाकूळ; उदयनराजे, शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांची हवा

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्रिमंडळाचा होऊ घातलेला विस्तार, राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार होणार याची नुसती वार्ता उठताच सातारा जिल्ह्यात मंत्रिपदांच्या नावांचा नुसता धुमाकूळ सुरू आहे. कोण म्हणतो उदयनराजे केंद्रात मंत्री होणार, कोण म्हणतो शिवेंद्रराजे राज्यात मंत्री होणार, कोण म्हणतो जयकुमार गोरे मंत्री होणार तर काहीजण मकरंद पाटील मंत्री होणार असे म्हणत आहेत. त्यामुळे या चौघांच्या नावांची सध्या जोरदार हवा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात व सोशल मीडियावरही सुरू आहे. त्यामुळे या चौघांच्या विरोधकांना मात्र भलतेच कापरे भरले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होत असल्याची चर्चा आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप काही मंत्र्यांना डच्चू देणार असून त्यांच्या जागी उदयनराजेंचा समावेश होईल, अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. अलिकडच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व खा. उदयनराजेंचे संबंध स्नेहाचे झाले आहेत. त्यामुळे उदयनराजेंना संधी मिळण्याची शक्यता सातारकरांना वाटू लागली आहे. उदयनराजेंच्या चाहत्यांनी नेहमी प्रमाणेच 'हवा हवाई' वातावरण तयार केले आहे. सोशल मीडियावर लाल दिव्याचा फोटो टाकून उदयनराजेंंच्या रिल्स केल्या जात आहेत. स्वत: राजे मात्र सातार्‍यात नाहीत तरीही त्यांची हवा मात्र जोरात वाहते आहे.

राज्यमंत्रिमंडळाचाही विस्तार होणार आहे. अजितदादांनी भाजपशी सोबत केल्याने शिवसेना शिंदे गट व भाजपची मंत्रिपदे जवळपास संपली आहेत. तरीही राज्यमंत्रीपदे शिल्लक असल्याने सातार्‍याला संधी मिळण्याची शक्यता वाटू लागली आहे. भाजपमधून आ. शिवेेंद्रराजे भोसले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. शरद पवार यांना सोडून ते भाजपमध्ये आल्याने त्यांच्या मंत्रीपदाविषयी सातारकरांना व शिवेंद्रराजेंच्या चाहत्यांना अपेक्षा लागून आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याही मंत्रीपदाचा धुमाकूळ सुरू आहे. आ. जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनाही भाऊ मंत्री व्हावे, असे वाटत आहे. आ. जयकुमार गोरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दहिवडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा घेवून भाजपचे वातावरण तयार केले. फडणवीस यांनीही या सभेचे कौतुक केले. भाजपची संघटना वाढवण्यात आ. गोरे यांनी घेतलेले कष्ट लक्षात घेता त्यांनाही मंत्रीपद मिळू शकेल अर्थात आ. शिवेंद्रराजे अथवा आ. जयकुमार गोरे दोघेही राज्यमंत्रीपद स्वीकारतात का? हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातून आता असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू मिळाला तर दोघांपैकी एकाला कॅबिनेट मंत्रीपदही मिळू शकते.

'कानामागून येऊन तिखट झाली' अशी म्हण आपल्याकडे आहे. गेले वर्षभर मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या आ. शिवेंद्रराजे व आ. जयकुमार गोरे यांच्यामागून सत्तापक्षात प्रवेेश केलेल्या आ. मकरंद पाटील यांच्या मंत्रीपदाची सर्वांत जास्त हवा सध्या जिल्ह्यात आहे. मुळातच ज्या दिवशी अजितदादा सत्तेत गेले त्याच दिवशी आ. मकरंद पाटील मंत्रीपदाची शपथ घेणार होते. मात्र, भावनिक राजकारणामुळे त्यांनी मागचा पाय घेतला त्यातून त्यादिवशीची संधी हुकली. मात्र, पुन्हा आ. मकरंद पाटील यांनी व्यवहारिक निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरलेल्या एका कॅबिनेट मंत्रीपदावर त्यांच्याच नावाची मोहर उमटली जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या सातारा जिल्ह्यात सर्वांत जास्त हवा त्यामुळेच आ. मकरंद पाटील यांच्या मंत्रीपदाची आहे.

ज्यांची नावे मंत्रीपदांसाठी घेतली जात आहेत त्यांच्या विरोधकांना मात्र दिवसेंदिवस कापरे भरू लागले आहेत. काही झाले तरी 'हा' मंत्री नाही झाला पाहिजे म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. मात्र, दोन-तीन दिवसात यासंदर्भातला निकाल लागणार असल्याने सातारा जिल्ह्याची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT