Latest

सातारा : परत पाय ठेवला तर खल्लास करीन : खा. उदयनराजेंकडून धमकी

Arun Patil

सातारा, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या जागेवरून बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 'ही माझ्या मालकीची जमीन आहे. परत पाय ठेवला तर पाय काढून खल्लास करीन,' अशी धमकी खा. उदयनराजे यांनी दिल्याची तक्रार आ. शिवेंद्रराजे समर्थक विक्रम पवार यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

खा. उदयनराजे भोसले यांच्यासह विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसाळ, सतीश माने, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ उर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण, नंदकुमार नलवडे, रोहित लाड, युनुस झेंडे, अनिल पिसाळ, काशिनाथ गोरड, संपत जाधव, शेखर चव्हाण, सौरभ सुपेकर, प्रवीण धस्के, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर जाधव, अर्चना देशमुख, गितांजली कदम, रंजना रावत, अश्विनी गुरव यांच्यासह अनोळखी 15 अशा एकूण 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रम पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन 2015 पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून कार्यरत आहे. मी सभापती होण्यापूर्वीच संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 6/3/2, 6/3/3, 6/3/4, 6/3/5/6/4/1/अ, 6/4/2/ब + 6/3/4/क, 6/3/4/अ, 6/3/4/ब, 6/3/1 यावर बाजार समिती सातारा अशी नोंदणी झालेली होती. मी सभापती झाल्यानंतर या जागेचे विकसन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तेव्हा मला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व जमिनीचे कुळ संपत जाधव, गणपत जाधव, अशोक जाधव (सर्व रा. सातारा परिसर) हे विरोध करू लागले. यामुळे मी पोलीस बंदोबस्तात संबंधित जागेचे विकसन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय येथे रिट पिटीशन नं 2390/2017 प्रमाणे अर्ज दाखल केला.

विक्रम पवार यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने पोलीस अधिक्षक यांना बाजार समितीला संबंधित जागेचे विकसन करण्यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा, असा आदेश पारित केला. त्यावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर रिट पिटीशन नं 8614/2017 प्रमाणे अर्ज करून स्थगिती मिळवली होती.

त्यानंतर सन 2017 ते 2022 पर्यंत रिट पिटीशनमध्ये वेळोवेळी सुनावणी होऊन दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची रिट पिटीशीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानुसार जागेच्या विकसनासाठी आम्हाला यापूर्वीच उच्च न्यायालयाने पोलिस बंदोबस्ताचा आदेश पारित केला होता. त्यानुसार आम्ही पोलिस अधिक्षकांकडे रितसर बंदोबस्तासाठी अर्ज केला. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व शासकीय शुल्क भरल्यानंतर दि. 20 जून 2023 ते दि. 26 जून 2023 रोजी पर्यंत पोलिस बंदोबस्त दिला.

सातारा पोलिस दलाचा बंदोबस्त मिळाल्याने संबंधित जागेवर काम सुरू करण्यासाठी आम्ही लोखंडी कंटेनर ठेवला होता. दि. 21 जून रोजी या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मी, आ. शिवेंद्रराजे भोसले, बाजार समितीचे संचालक तसेच इतर काही लोक हजर असताना सकाळी अंदाजे 9.45 वाजता संशयितांनी पोलिस बंदोबस्त असतानाही आमच्या विकसनाच्या कामास विरोध केला. मी तसेच आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. तसेच पोलिसांनी त्यांना व आम्हाला शांततेचे आवाहन केले.

तरीही संशयितांनी आमचे तसेच पोलिसांचे काही न ऐकता खा. उदयनराजे भोसले यांनी मला 'ही माझ्या मालकीची जमीन आहे. परत पाय ठेवला तर पाय काढून खल्लास करीन,' अशी धमकी दिली. तसेच आम्ही त्याठिकाणी विकसन कामासाठी ठेवलेला लोखंडी कंटेनर (ट्रक क्रमांक एमएच46 एच 4269) मधून आणलेल्या पोकलेनने तोडफोड करून अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान केल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

धमकी देवून 2 लाखाचेही नुकसान…

जीवे मारण्याची धमकी देऊन 2 लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याची तक्रार विक्रम पवार यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार बेकायदा जमाव, धमकी देणे, तोडफोड करुन नुकसान करणे अशा कलमाखाली खा. उदयनराजे यांच्यासह 49 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

SCROLL FOR NEXT