Latest

सातारा : रक्तबंबाळ होवून परतलेला तात्यांचा छावा विजयाचा टिळा लावूनच कारखान्यात गेला

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  रक्तबंबाळ होवून परतलेला लक्ष्मणतात्यांचा छावा विजयाचा टिळा लावूनच किसनवीर कारखान्यात गेल्याचा हृदयस्पर्शी प्रसंग अवघ्या कारखाना परिसराने मंगळवारी अनुभवला. या घटनेने सुमारे 17 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच. शिवाय जुने हिशोब चुकते केल्याचेही दिसून आले.

त्याचे असे झाले, 19 वर्षापूर्वी किसनवीर सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर झाले होते. त्यावेळी लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांच्याकडून हा कारखाना मदनदादा भोसले यांच्याकडे आला होता. कारखान्यातील सत्तांतरानंतर मदनदादांच्या गोटात जल्लोष होता. या सत्तांतरानंतर झालेल्या एका वार्षिक सभेत बराच हंगामा झाला होता. एवढेच काय दोन्ही गटात तुफान दगडफेकही झाली होती. त्यामध्ये लक्ष्मणतात्यांचे चिरंजीव नितीनकाका पाटील जखमी झाले होते. दगडफेकीमुळे डोक्याला भळभळती जखम झाली. रक्तबंबाळ झालेल्या नितीनकाका व मकरंदआबांच्या जिव्हारी ही घटना लागली होती. हा रक्तप्रपात त्यावेळी सार्‍यांनाच खुपला होता. या प्रसंगानंतर मकरंदआबा, नितीनकाका कारखान्याच्या वार्षिक सभेकडे कधी फिरकलेही नाहीत. त्यांनी कारखान्याच्या सर्वच वार्षिक सभांकडे पाठ फिरवली होती. मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज चालले होते. गत पंचवार्षिक वेळी निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर मात्र कारखान्याकडून शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी आणखी झळ सोसावी लागत होती, असे आरोप होवू लागले होते. कारखान्याच्या कारभाराविषयी जनमाणसांमध्ये नाराजी होती. शेतकर्‍यांचा ऊस शेतातच पडून राहिला होता. त्यामुळे लोकहित म्हणून आणि लक्ष्मणराव तात्या यांची समाजाप्रती कार्यरत राहण्याची शिकवण यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांनी लक्ष घातले. शेतकर्‍यांची घरे वाचवण्यासाठी त्यांनी निवडणुकीत पॅनल टाकले आणि भरघोस मतांनी निवडूनही आणले.

आता मात्र शेतकर्‍यांचे हित साधण्यासाठी सर्व बोजा डोक्यावर घेवून संचालक मंडळासोबत नितीनकाका पाटील यांनी आज मंगळवारी कारखान्यात एंट्री केली. साधरणत: 17 वर्षापूर्वी वार्षिक सभेतील दगडफेकीत जखमी झालेला लक्ष्मणतात्यांचा छावा मंगळवारी मात्र विजयाचा टिळा लावूनच कारखान्यात पोहोचला. कारखान्यात एंट्री करताच नितीनकाकांनी सर्व कर्मचारी वर्गाची भेट घेतली.यावेळी इनचार्ज एम. डी. शिंदे व प्रमुख अधिकारी वर्ग यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी चर्चा केली. हा कारखाना आपणा सर्वांचा आहे. तो वेळेत सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहनही नितीनकाकांनी अधिकार्‍यांना यावेळी केले.

कोणाविषयी द्वेष, आकस नाही; मात्र काम करावेच लागेल

आम्हाला कोणाचा द्वेष व आकस नाही. तुम्ही मन लावून काम करा, आपल्याला हा कारखाना वाचवायचा आहे.तो पूर्ण क्षमतेने चालवायचा आहे. यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. यातून शेतकर्‍यांनाच न्याय दिला जाणार आहे, अशी ग्वाही नितीनकाकांनी दिली. त्याचवेळी कारखान्याचे कामकाज करताना जाणीवपूर्वक कोणी चूक करेल तर त्याला योग्य ती शिक्षा होईल, असे सुनावलायही नितीनकाकांनी मागे-पुढे पाहिले नाही. कारखान्याला पूर्वीचे वैभव देण्याचीच त्यांची तळमळ असल्याचे आजच्या त्यांच्या एंट्रीवेळच्या देहबोलीतून दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT