Latest

Satara : मटण खायला दिले नाही म्हणून वडिलांचा खून

Arun Patil

दहिवडी ; पुढारी वृत्तसेवा : कासारवाडी (ता. माण) येथील नटराज पांडुरंग सस्ते या युवकाने मटण खायला का घालत नाही? म्हणून वडील पांडुरंग बाबुराव सस्ते यांचा शेतात पाठलाग करून कुर्‍हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी 4.45 वा. घडली.

नटराज सस्ते हा युवक मटण वारंवार का आणत नाही आणि मला का खायला घालत नाही, यावरून वडिलांशी वारंवार हुज्जत घालायचा. वडील त्याला नेहमी समजावायचे, आपली परिस्थिती बेताची आहे, मटण खूप महाग असल्यामुळे ते नेहमी आपल्याला आणून खायला परवडणार नाही. तरीदेखील तो वडिलांना धमकी द्यायचा, कुठूनही पैसे आणा आणि मला खाण्यासाठी मटण घेऊन या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारीन.

याअगोदरही त्याने मटण का आणले नाही या कारणावरून वडिलांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात वडील अनेकदा बचावले होते. तरीदेखील वडिलांनी अनेकदा परिस्थिती नसतानाही त्याला अनेकदा मटण खायला दिले. त्याला त्याची चांगलीच चटक लागली. त्यामुळे त्याला मटण खायला नाही मिळाले कि तो वेड्यासारखा करायचा आणि वडिलांच्या अंगावर धावायचा.

शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी तो वडिलांना मटण आणण्यासाठी आग्रह करत होता. पण, वडिलांनी पैसे जवळ नसल्याने मटण आणण्याचे टाळले. त्यामुळे चिडून तो वडिलांच्या अंगावर धावून जावून त्यांना मारहाण करू लागला. भीतीने वडील शेताच्या दिशेने पळू लागले. या माथेफिरूने वडिलांचा पाठलाग करत हातामध्ये असलेल्या कुर्‍हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांचा खून केला.

घटनेची तक्रार पत्नी चतुराबाई पांडुरंग सस्ते यांनी दहिवडी पोलिसांत दिली. तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व पोलीस उपनिरीक्षक डी. जी. तुपे करत आहेत.

SCROLL FOR NEXT