Latest

सातारा : फलटणमध्ये आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर बाप-लेकाचा मृत्यू?

दिनेश चोरगे

साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा :  फलटण शहरातील गजानन चौकात राहणार्‍या पोतेकर कुटुंबातील तिघांनी शनिवारी रात्री जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला. यानंतर त्यांना त्रास झाला. त्यामुळे या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता या तिघांपैकी बाप-लेकाचा केवळ 15 मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. याप्रकरणात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समोर येणार आहे.

हनुमंतराव रामभाऊ पोतेकर (वय 55) आणि त्यांचा मुलगा अमित पोतेकर (32, दोघेही रा. गजानन चौक, फलटण) अशी मृत्यू झालेल्या बाप-लेकांची नावे आहे. तर मुलगी श्रद्धा पोतेकर हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

याबाबत माहिती अशी, हनुमंतराव पोतेकर, त्यांची पत्नी, मुलगा अमित व मुलगी श्रद्धा यांनी शनिवारी रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर हनुमंतराव, अमित व श्रद्धा यांनी आयुर्वेदिक काढा प्राशन केला. काढा प्याल्यानंतर हे सर्वजण झोपी गेले. मात्र, मध्यरात्री या तिघांना त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटेच्या सुमारास वडील हनुमंतराव व मुलगा अमित यांचा अवघ्या 15 मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलगी श्रद्धा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या घटनेमुळे पोतेकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर त्रास होऊन पिता पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. जेवणानंतर घेतलेल्या काढ्यामुळे मृत्यू झाला का? अशी चर्चा परिसरात होती. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या घटनेची नोंद आकस्मित मयत म्हणून फलटण शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

SCROLL FOR NEXT