सातारा; पुढारी वृत्तसेवा : एकसळ, ता. कोरेगाव येथे 20 वर्षांपूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाला वाचा फुटली आहे. फरार असलेल्या संशयिताला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (एलसीबी) अटक केली. किसन नामदेव जाधव (वय 70, रा. भूषणगड, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
मालन बुधावले (वय 35, रा. एकसळ, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खुनाची घटना दि. 12 फेब्रुवारी 2002 रोजी घडली होती. मालन व किसन दोघे अनेक महिन्यांपासून त्यावेळी एकत्र राहत होते. मात्र, त्यांच्यामध्ये वारंवार विविध कारणांवरून भांडणे होत होती. घटनेदिवशीही दोघांमध्ये रात्री भांडण झाले. त्यावेळी शेजारी असणार्या नागरिकांनीही भांडणे ऐकली होती. मात्र दुसर्या दिवशी सकाळी मालन व किसन कोणीही घरातून बाहेर पडले नाही. उशीरापर्यंत काही हालचाल जाणवली नसल्याने शेजार्यांना शंका आली. घरात पाहिले असता मालन यांना गंभीर मारहाण झाल्याचे लक्षात आले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदन झाल्यानंतर मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी स्वत: याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडला नाही. महिना, वर्ष, दहा वर्षे झाल्यानंतर न्यायालयाने संशयिताला फरार घोषित केले. 20 वर्षे उलटून गेल्यानंतर मात्र या खुनाला वाचा फुटली.
एलसीबी पोलिसांना पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची यादी चाळली असता त्यामध्ये किसन जाधव याचे नाव होते. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या हाती खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार संशयिताला गुरुवारी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस सुधीर बनकर, सचिन साळुंखे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हेही वाचा :