Latest

सातारा : शाळकरी मुलाचे कोयत्याने बोट छाटले

दिनेश चोरगे

शिरवळ; पुढारी वृत्तसेवा :  शिरवळ (ता. खंडाळा) येथे एका शाळेच्या परिसरात दोन शालेय विद्यार्थ्यांवर एका विद्यार्थ्याने कोयत्याने हल्ला केला. एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. एका विद्यार्थ्यावर 7 ते 8 वार झाले आहेत तर मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसर्‍या मित्राचे बोट छाटले आहे. या घटनेमुळे शिरवळमध्ये खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वार करणारा संशयित व ज्याच्यावर वार झाले तो या दोघांमध्ये गुरुवारी काही कारणामुळे वाद झाला होता. यावरून संशयिताने दगडाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालक व शिक्षकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. या वादाचा राग मनात धरून संशयित हा सकाळीच आईला शाळेत जातो, असे सांगून घराबाहेर पडला. शाळेत तो कोयता घेवून आला होता. हा कोयता त्याने एकाला दाखवलाही होता. शाळा सुटताच काही कळायच्या आतच त्याच्यावर संशयिताने वाद झालेल्या विद्यार्थ्यावर वार केले. हे वार त्याच्या हातावर, पायावर, खांद्यावर झाले. दरम्यान, आपल्या मित्रावर हल्ला होत आहे हे बघून पुढे आलेल्या आणखी एका शालेय विद्यार्थ्यांवर देखील संशयित मुलाने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचे बोट छाटले गेले. या हल्ल्यात दोन्ही शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यातील एकावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दुसर्‍यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नुकतीच शाळा सुटलेली असल्यामुळे शाळेतील मुलांची रस्त्याने गर्दी होती. त्यामुळे बघणार्‍यांना काही समजण्याच्या आतच हा प्रकार रस्त्यावरच घडला. परिसरातील स्थानिक मदतीला धावेपर्यंत हल्लेखोर मुलगा हल्ला करून तिथून पळून गेला होता. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिरवळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्यांच्यावर वार झाले त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चार दिवसांपूर्वीच घेतले होता प्रवेश
हल्ला करणार्‍या अल्पवयीन मुलाने नुकतेच शिरवळ येथील शाळेत चारच दिवसांपूर्वी प्रवेश घेतला होता. त्याने चारच दिवस शाळेला हजेरी लावली होती. शुक्रवारी सकाळी शाळेत जातो म्हणून आईला सांगून घराबाहेर पडलेला मुलगा शाळेत न जाता मित्रावर दबा धरून शाळेच्या परिसरातच दिवसभर बसला होता. गुरुवारच्या झालेल्या वादाचे इतक्या भयानक घटनेत पर्यवसान होईल, याचा विचारही कुणी केला नव्हता.

SCROLL FOR NEXT