Latest

सातारा : ‘लघू पाटबंधारे’च्या ४९ निविदा रद्द

दिनेश चोरगे

सातारा :  खटाव व माण तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाझर तलाव, साठवण तलाव, बंधारे अशा विविध कामांच्या 49 निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत जबाबदार अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलणे टाळल्याने या प्रकारात काही काळबेरं तर नाही ना, अशी शंका व्यक्त होऊ लागलली आहे.

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियान 2.0 या लेखाशिर्षा अंतर्गत 1 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीसाठी निविदा सूचना क्रमांक 5 अन्वये 66 कामांच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. प्रसिध्द केलेल्या निविदांपैकी पाझर तलाव, साठवण तलाव, बंधारे अशा विविध कामांच्या 49 निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

माण तालुक्यातील पांगरी, मनकर्णवाडी, पळशी, बिजवडी, किरकसाल (चोरमलेदरा, खोपडा, वाघजाई ओढा), भांडवली (मळा), शिरवली (कडा), वारुगड (गायदरा गोसावीदरा, मलवडदरा), पाचवड (हुंबेवस्ती, तरवडे तलाव), कासारवाडी (चौंडी), किरकसाल (जाधवमळा, इनाम, माऊलीचा ओढा, म्हारकीचा ओढा, सारभूकुम मळा, जानुबाई मळा, बामनाचा ओढा, कुरणाचा ओढा) नरवणे, पळशी (सावंत वस्ती, सुरुख ओढा), बिजवडी, शिरवली (दरा), गोंदवले खुर्द, गोंदवले बु., पिंपरी, भांडवली, पाचवड, स्वरुपखानवाडी, टाकेवाडी, वारुगड खटाव तालुक्यातील डाळमोडी, मांडवे, पेडगाव. सुर्याचीवाडी, यलमारवाडी, बोंबाळे, सूर्याचीवाडी, यलमरवाडी, गणेशवाडी या गावात पाझर तलाव दुरुस्ती, साठवण बंधारे दुरुस्ती, कोल्हापूर पध्दती बंधारा दुरुस्ती, ग्राम तलाव दुरुस्ती, साठवण बंधारा बांधणे आदी कामे करण्यात येणार होती. मात्र या सर्व कामांची निविदाच लघुपाटबंधारे विभागामार्फत रद्द करण्यात आली आहे. लघु पाटबंधारे विभागाने सुमारे 49 कामांच्या निविदा रद्द केल्या असल्याने पाझर, ग्राम तलावाची कामे खोळंबणार आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार असून दुष्काळाची दाहकता अधिक भीषण होण्याची भिती वर्तवली जात आहे.

दुष्काळात तेरावा …

जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कायम दुष्काळी असलेल्या माण, खटाव तालुक्याला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही गावांना वर्षांनुवर्षे टँकर सुरू आहेत. जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या 49 पाझर तलावांच्या कामामुळे या गावांना दिलासा मिळणार होता. या योजना मार्गी लागल्यास माण-खटावच्या दुष्काळाचे मळभ दूर होणार होते. मात्र, लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे 49 निविदा रद्द झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती ओढवणार आहे.

SCROLL FOR NEXT