Latest

Sanjay Singh Press: तुरुंगातून सुटका होताच, आप खासदार संजय सिंह यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘भाजप…’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले आप खासदार संजय सिंह यांची दोन दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटका करण्यात आली. यानंतर त्यांनी आज (दि.५) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 'भाजपनेच दिल्ली मद्य धोरण घोटाळा केला असून, यामध्ये भाजपचे अनेक बडे नेते सहभागी आहेत'. असा खळबळजनक दावा केला आहे. (Sanjay Singh Press)

पुढे आप खासदार संजय सिंह यांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांना देखील कटाचा भाग म्हणून अटक करण्यात आला आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात जे लोक आरोपी म्हणून पकडले गेले, त्यांनी केजरीवाल यांचे नाव घेईपर्यंत ईडीने त्यांचे वक्तव्य विश्वासार्ह मानले नाही, पण अरविंद केजरीवाल यांचे नाव घेताच त्यांनी ते मान्य केले, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. (Sanjay Singh Press)

'या' आरोपींच्या वक्तव्यावरून केजरीवाल यांना अटक

या संशयित आरोपी व्यक्तिंच्या वक्तव्यावरून केजरीवाल यांना अटक करण्यात आली. सरकार स्थापन केल्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत आरोपींची नावे घेतली. यामध्ये संजय सिंह यांनी पहिले नाव मगुंता रेड्डी आणि दुसरे नाव शरथ रेड्डी असे घेतले आहे.

भाजपचे मगुंता रेड्डी यांनी दबावाखाली केजरीवालांचे नाव घेतले

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात भाजप नेते मगुंता रेड्डी आणि त्यांचा मुलगा राघव मगुंता यांचा सहभाग असल्याचा दावा खासदार संजय सिंह यांनी केला. दबावाखाली त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात वक्तव्य केले. त्यांच्या नऊ विधानांमध्ये काहीही नव्हते तर दहाव्या विधानात अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतल्याचे दिसते, असेही सिंह यांनी परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

सहा महिने शरत रेड्डी तुरुंगात राहिल्यानंतर तुटून गेला अन्…

संजय सिंह पुढे म्हणाले, यानंतर शरत रेड्डी यांचे नाव येते. त्यांचे 12 जबाब घेण्यात आले. आपल्या सुरुवातीच्या विधानांमध्ये ते सांगत राहिले की ते केजरीवाल यांना ओळखत नाहीत. सहा महिने शरत रेड्डी तुरुंगात राहिल्यानंतर ते तुटून गेले आणि त्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात वक्तव्य केले. त्यानंतर त्याला जामीनही मिळाला. भाजपने शरत रेड्डी यांना दारू घोटाळेबाज म्हटले आहे. मात्र त्यांनेच भाजपला ५५ कोटी रुपये दिले आहेत. 21 मार्च रोजी मद्य घोटाळा भाजपनेच केल्याचे सिद्ध झाले आणि दुसरीकडे केजरीवाल यांना रात्री अटक करण्यात आली, असे देखील संजय सिंह यांनी म्हटले आहे.

जितका मोठा भष्टाचारी, तितका मोठा पदाधिकारी

शेवटी आप खासदार संजय सिंह म्हणाले, केजरीवाल पूर्णपणे निष्कलंक आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची शिक्षा त्यांना भोगली जात आहे.
जो जितका मोठा भ्रष्ट, तितका मोठा पदाधिकारी असा भाजपचा नारा आहे.

 इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगात पाठवण्याची तयारी

ते पुढे म्हणाले, सत्ताधारी भाजप सरकारकडून 'इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगात पाठवण्याची तयारी करत आहेत. देशातील लोकशाही आणि राज्यघटनेसाठी हे अत्यंत घातक असून त्याविरोधात लढा देण्याची गरज आहे. स्वातंत्र्यापूर्वी भाषण आणि जगण्याचे स्वातंत्र्य नसल्यामुळे महात्मा गांधींनी ब्रिटीश राज्यकर्त्यांविरुद्ध लढा दिल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही आता तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांना अटक ही 'हुकूमशाही'ची नांदी

तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी गुरुवारी कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात प्रार्थना केली. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला शहाणपण येण्याचे मागणे मागितल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ज्या प्रकारे दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आले, ही देशातील 'हुकूमशाही'ची नांदी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT