Latest

खा. संजय राऊत यांनी ‘भीमा-पाटस’ची चिंता करू नये; आ. राहुल कुल यांचा सल्ला

अमृता चौगुले

यवत; पुढारी वृत्तसेवा : 'खासदार संजय राऊत यांनी भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याची चिंता करू नये, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत,' असा सल्ला भीमा -पाटस कारखान्याचे अध्यक्ष आणि दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी राऊत यांना दिला आहे.
बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भीमा-पाटस साखर कारखान्याला भेट देत वरवंड येथे जाहीर सभा घेऊन आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी गुरुवारी आ. राहुल कुल यांनी भीमा-पाटस कारखान्यावर पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना हा सल्ला दिला आहे.

या वेळी बोलताना आ. कुल पुढे म्हणाले की, 'संजय राऊत हे खासदार आहेत, परंतु त्यांचे आरोप हे अर्धवट स्वरूपातील आहेत. त्यांची सहकारातील माहिती ही तशीच अर्धवट आहे. भीमा-पाटसची चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर चौकशी जरूर करावी, पण ती 1992 पासून पूर्ण चौकशी करावी म्हणजे तालुक्यातील जनतेला व राऊत यांना कळेल की, आपल्या शेजारी डाव्या व उजव्या बाजूला बसलेले लोक कसे यात दोषी आहेत.

संजय राऊत यांनी या ठिकाणी येऊन सभा घेणे हा विषय मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा आसावा, असे मला वाटते, असे कुल यांनी सांगितले. ते म्हणाले, की राऊत यांनी केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजे होते, कारण उसाला आणि साखरेला किमान दर देण्याचे धोरण केंद्र शासनाने आणले. यामुळे साखर कारखानदारी सुस्थितीत येण्यास मदत होणार आहे.

राऊत यांनी बुधवारी आरोप केलेल्या 36 कोटींच्या खर्चाचा हिशेब राज्य शासनाला दिला आहे. साखर आयुक्त आणि राज्य शासनाकडे तो उपलब्ध आहे, असेही कुल यांनी सांगितले. भीमा-पाटसचे 50 हजार सभासद खरे मालक आहेत. त्यांना सर्व वस्तुस्थिती माहिती आहे. माझे कुटुंब 60-70 वर्षे राजकारणात असून, माझ्या कुटुंबाचा इतिहास उज्ज्वल असून, कोणाच्या कुटुंबाचा इतिहास कसा आहे, यावर मी बोलणार नाही, असेही आ.कुल म्हणाले. भीमा-पाटसच्या विषयाला राऊत आणि इतरांनी राजकीय स्वरूप देऊ नये, अशी विनंती मी सर्वांना करत असल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत यांना कारखान्यावर जाण्यापासून अडवण्यात आलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, की आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना नव्हत्या. 25 तारखेच्या सभेला कोणालाही आडवा, असे मी कोणालाही सांगितलेले नाही. भीमा-पाटस सभासदांना विश्वासात न घेता निराणी ग्रुपला देण्यात आल्याबद्दल ते म्हणाले, की कारखाना चालवण्यासाठी खुले टेंडर देण्यात आले होते.

त्यामुळे कारखाना कोणाला चालवायला देणे, हे कोणाच्या हातात नव्हते, ज्यांनी टेंडर भरले त्यांना तो मिळाला मी विधानसभा हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्याने हे सगळे प्रकरण सुरू झालं असून खा. संजय राऊत यांनी मी समितीचा अध्यक्ष झाल्याचे खूप मनावर घेतले आहे, खरे तर हक्कभंग समितीचे कामकाज हे अर्ध न्यायीक स्वरूपाचे असून राऊत यांनी या विषयावर टीका करणे हे त्यांचे दुर्दैव आहे
बाजार समितीला पहिल्यांदाच पूर्ण पॅनल तयार केला आहे , या वेळी पूर्ण नियोजन करून निवडणूकिला सामोरे जातोय आणि या निवडणुकीत आम्हाला निश्चित यश मिळेल असा विश्वास असल्याचे आ.कुल यांनी सांगितले

राऊतांना कोणीही गंभीरपणे घेत नाही

संजय राऊत यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही त्यामुळे माध्यमांनी त्यांना महत्त्व देऊ नये, असे सांगत आ. कुल म्हणाले, संजय राऊत यांनी रमेश थोरात यांच्या ताब्यात कारखाना द्या, असे आवाहन केले. त्या थोरात यांनी गेल्या पाच कारखाना निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, यावरून त्यांना कारखान्याबद्दल किती प्रेम आहे हे सभासदांना समजून आले आहे, असे सांगत त्यांनी आमदार रवींद्र धंगेकर हा मोठा माणूस असून, त्यांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडत असल्याने त्यावर मी बोलणं उचित नाही, असे स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT