Latest

सांगली : बहुचर्चित ‘घनकचरा’साठी 85 कोटींच्या निविदा

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित घनकचरा प्रकल्पांतंर्गत विविध कामांसाठी सुमारे 85 कोटीच्या निविदा मागवण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. विशेष म्हणजे कचरा डेपोत ट्रिमिक्सचे रस्ते होणार आहेत. त्यासाठी 4.50 कोटींच्या कामांच्या निविदांचा प्रस्ताव स्थायी सभेपुढे आला आहे.

महापालिकेची स्थायी समिती सभा शुक्रवारी होणार आहे. अध्यस्थानी सभापती धीरज सूर्यवंशी आहेत. घनकचरा प्रकल्पासाठी भाजपअंतर्गत बर्‍याच घडामोडी घडल्या. आवटी गटाने मंजूर केलेली घनकचरा प्रकल्पाची निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यासाठी भाजपमधील प्रबळ गटाने जोरदार हालचाल केली होती. आमदार सुधीर गाडगीळ, नेते शेखर इनामदार, स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी हे घनकचरा प्रकल्पाच्या फेरनिविदेसाठी शासन आदेश काढण्यात यशस्वी झाले. त्यानुसार गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या घनकचरा प्रकल्पाची फेरनिविदा काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर आणला आहे. दि. 20 रोजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

समडोळी व बेडग रोडवरील कचरा डेपोमधील दैनंदिन येणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करणे, विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणी व प्रक्रिया करण्यासाठी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव आणला आहे. यासाठी प्रशासनाने 43 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांचा प्रस्ताव आणला आहे.
समडोळी रोड आणि मिरज-बेडग रोडवरील कचरा डेपोमधील जुना साठलेला कचर्‍यावार बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करणे, विल्हेवाट लावण्याकरीता एजन्सी नियुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव आणला आहे. तो 36 कोटी 13 लाखाचा आहे. बेडग रोड कचरा डेपोमधील कंपाऊंड बांधण्यासाठी 2 कोटी 27 लाख, समडोळी रोडवरील कचरा डेपोभोवती कंपाऊंड भिंत बांधण्यासाठी 2 कोटी 91 लाखाचा प्रस्ताव आहे.
समडोळी रोडवरील कचरा डेपोमधील बफर झोनमधील पूर्व बाजू, पश्चिम बाजूसह सर्व रस्ते ट्रिमिक्स पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 4 कोटी 50 लाखाचा प्रस्ताव आहे. या सर्व कामांच्या निविदा मागवण्यात येणार आहेत. लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती रोडवरील दुभाजकामध्ये हरितक्षेत्र विकसित करण्यासाठी एक कोटीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT