Latest

सांगली : शॉर्टसर्किटने आग; लाखोंचे नुकसान

backup backup

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा येथील पेठ रस्त्यावरील दुकान गाळ्यांना मंगळवारी सकाळी शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत चार दुकानगाळे जळून खाक झाले. या गाळ्यात असणारे हॉटेल, बेकरी व गॅरेजमधील सर्व साहित्य जळाले. यामध्ये 21 दुचाकी व रोख रकमेचा समावेश आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

इस्लामपूर-पेठ रस्त्यावर संभाजीनगर परिसरात शिवाजीराव माने यांच्या मालकीचे 20 पत्र्यांचे गाळे आहेत. यातील एका गाळ्याला सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यानंतर या दुकानाला लागूनच असलेल्या सज्जाद हवलदार यांच्या गॅरेजला व लालासो येळापूरे यांच्या बेकरी – कोल्ड्रिंक्स, हॉटेलला आग लागली. या आगीत गॅरेजमधील 21 दुचाकी, हॉटेल, बेकरीमधील 10 फ्रिज, टेबल, खुर्च्या, फॅन, मिक्सर, ज्यूसर, माल, काही रोख रक्कम आदी जळून खाक झाले.

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुकानांचे मालक ईद असल्यामुळे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांचे मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी लवकर संपर्क होऊ शकला नाही. तसेच पालिकेची अग्निशमक गाडी वेळेत न आल्याने ही आग आटोक्यात आली नाही.

त्यामुळे संपूर्ण चार दुकानगाळे जळून खाक झाले. आगीचे व धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. या आगीचा तलाठ्यांनी पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

व्यावसायिकांच्या डोळ्यात अश्रू…

मंगळवारी अक्षय्यतृतीया व रमजान ईदचा सण होता. या दिवशीच व्यावसायिकांचे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. आगीने झालेले नुकसान पाहून व्यावसायिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

SCROLL FOR NEXT