Latest

सांगली : ग्रामीण भाग अजूनही ‘अंधश्रद्धे’च्या विळख्यात

backup backup

सांगली; गणेश कांबळे : प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करायचे असेल, एखाद्या लढाईत विजय मिळवायचा असेल; तर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला कामाला लावले की आपले काम फत्ते होते, असा अनेकांचा समज आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला. त्यामुळे अजून ग्रामीण भाग अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्यासाठी करणी, भानामती, जारण-मारणचा प्रयोग केल्याचे दिसून आले. त्यासाठी नारळ, लिंबू, गुलाल, कुंकू, हळद अशा वस्तू विरोधकांच्या बूथजवळ पुरून ठेवल्याचे आढळून आले. मतमोजणीनंतर अशा करणी, भानामतीचा नेमका काय परिणाम झाला हे जरी दिसून आले नसले तरी अशा अंधश्रद्धा मानसिकतेचा फायदा घेणारे भोंदूबुवांचाही सुळसुळाट मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुका आल्या की, लोकांच्या अंधश्रद्धा मानसिकतेचा फायदा उठवण्यासाठी राजकीय मंडळी सरसावत असतात. कधी देवाचा भंडारा उचलून अमूक एकाला मतदान करेन, अशी मतदारांना शपथ दिली जाते, तर कधी विरोधी गटाला मतदान केल्यास करणी, भानामती सारखे प्रयोग करू, अशी भीती घातली जाते.

खरोखर पैशांचा पाऊस पडतो का?

गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेच्या अनेक गोष्टी दिसून येत आहेत. गुप्तधन मिळवून देण्याच्या बहाण्याने मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सोलापूर जिल्ह्यातील एका भोंदूने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषारी द्रव देऊन त्यांचा खून केला. तशीच घटना पुरोगामी तालुका समजल्या जाणार्‍या वाळव्या तालुक्यात घडली. पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून परजिल्ह्यातील एका बुवाने महाराज बनून पाच लाख रुपये पळवून नेले.

मंत्राने रोग बरे करण्याचा दावा

आटपाडी गावातही अशा भोंदूबुवांचा शिरकाव झालेला आहे. तेथे तर एका दाम्पत्याने चक्क हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून मंत्रतंत्राने रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला.

राजकीय वरदहस्ताने भोंदूगिरी

काही गावात अंधश्रद्धेची दुकाने राजकीय नेत्यांच्या पुढाकाराने स्थापन होताना दिसत आहेत. दररोज हजारो रुग्णांची गर्दी या ठिकाणी होते. दररोज भाविकांची लाखोंची लूट होताना दिसत आहेत. एवढेच नाही तर अशा अंधश्रद्धा बुवांचे उपचाराचे व्हिडीओही दररोज व्हायरल होत असतात आणि उपचाराच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असतो. कायद्याच्या संरक्षणाखाली आणि नेत्यांच्या उपस्थितीत अंधश्रद्धेचा बाजार भरत असल्यामुळे त्यांना कोण थोपवणार, असा प्रश्न आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT