Latest

सांगलीचे कारागृह मिरजेला हलविणार!

दिनेश चोरगे

सांगली; सचिन लाड :  कैद्यांची वाढती संख्या…सभोवताली झालेल्या लोकवस्तीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा मध्यवर्ती कारागृह मिरजेला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीपासून अवघ्या आठ किलोमीटर 35 एकर जागा पाहण्यात आली आहे. या जागेवरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव कारागृह विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. नेमकी कुठे जागा कुठे? याबाबत प्रशासनाने कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

अबब…436 कैदी

सांगलीत राजवाडा चौकात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे हे कारागृह आहे. 235 कैद्यांची क्षमता असलेले हे कारागृह नेहमीच 'हाऊसफुल्ल' असते. 205 पुरूष व 30 महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. सध्या 436 कैदी आहे. यामध्ये 411 पुरूष व 25 महिलांचा समावेश आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या आलेखात प्रचंड वाढ झाली असल्याने सातत्याने कच्चा कैद्यांची संख्याही वाढत आहे. मध्यंतरी नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला होता. त्यांची कोल्हापुरातील कळंबा कारागृहात रवानगी केली जात होती. मात्र तिथेही साडेतीन हजारहून अधिक कैदी झाल्याने त्यांनी सांगलीतील कैद्यांना घेण्यास बंद केले आहे.

जागेचा शोध

सध्या कारागृहातील सुरक्षा अत्यंत धोकादायक वळणावर आहे. गेल्या दहा वर्षापासून हे कारागृह स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तत्कालीन अधीक्षक एम. एस. पवार, सुशील कुंभार, राजेंद्र खामकर यांनी जागा शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला. कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा निश्चित करण्यात आली. मात्र ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असल्याने त्यांनी नकार दिला. तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी सहा वर्षापूर्वी कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. कवलापुरातील जागेचीही त्यांनी पाहणी केली. लोकप्रतिनिधींची उदासिनतेमुळे ही जागा मिळालीच नाही.

सातशे कैद्यांच्या क्षमतेचे नवे कारागृह कारागृहाच्या परिसरात लोकवस्ती नसावी. कारागृहापासून शासकीय रुग्णालय व न्यायालय आठ ते नऊ किलोमीटर परिसरात असावे, असा नियम आहे. यासाठी कवलापुरची जागा योग्य होती. पण ती मिळाली नाही. आता मिरजेजवळ एका ठिकाणी जागा निश्चित केली आहे. साधारपणे 35 एकर ही जागा आहे. ही जागा मिळावी, यासाठी प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु अजून कोणताही निर्णय झाला नाही. ही जागा मिळाल्यास तिथे सातशे कैद्यांना हलविण्यात येऊ
शकते.

कैद्यांची सुरक्षा धोक्यात!

कारागृहापासून दोनशे मीटर परिसरात बांधकामे असू नयेत, असा नियम आहे. मात्र सभोवताली टोलेजंग इमारती झाल्या आहेत. कित्येकदा कैद्यांना दारू, गांजा व नशेच्या गोळ्या संरक्षक भिंतीवरून फेकण्याचे प्रकार घडले आहेत. कैदी पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी 65 कैद्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना ठेवायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. सलग दोन वर्षे महापुराचे पाणी कारागृहात घुसले होते. या पाण्यातून दोन कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सर्व कैद्यांना दुसर्‍या मजल्यावरील बरॅकमध्ये ठेवावे लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT