Latest

सांगली : ‘बायोमेडिकल वेस्ट’च्या ठेक्यात राजकीय हितसंबंध

backup backup

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : जैव वैद्यकीय कचर्‍यावर (बायोमेडिकल वेस्ट) प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पाच्या ठेक्यातील राजकीय हितसंबंधाची चर्चा महानगरपालिका वर्तुळात जोरात सुरू आहे. निवडणुकीत एका सदस्याने केलेल्या मदतीची परतफेड म्हणून या ठेक्याची घाईगडबड सुरू असल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अद्याप मान्यता नसतानाही ठेक्याचे ठरावावर ठराव होत आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालये व दवाखाने यामधून निर्माण होणारा जैविक कचरा वाहून नेणे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेचा बेडग रोडवरील कॉमन इन्सिनरेटर आहे. तो चालविण्यास देण्याचा ठेका वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. महापालिकेने हा प्रकल्प चालविण्यासाठी दि. 20 ऑगस्ट 2014 रोजीच्या ठरावाने आयएमए मिरज यांची नियुक्ती केली होती. दहा वर्षे कालावधीकरता प्रकल्प चालविण्यास देण्याची वर्क ऑर्डर दि. 18 डिसेंबर 2014 रोजी दिली होती. दरम्यान, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पात दुरुस्ती करण्याबाबत व दुरुस्ती करेपर्यंत प्रकल्प बंद ठेवण्याबाबत दि. 25 एप्रिल 2017 रोजी कळवले होते. त्रुटी पूर्ण करण्यासाठी आयएमए मिरज यांनी तीन महिने मुदत मागवून घेतली होती. मात्र त्रुटी पूर्ण करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता अद्याप घेता आलेली नाही. अद्यापही ती मान्यता मिळालेली नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची दि. 8 मार्च 2022 रोजी मुंबईत बैठक झाली. प्रकल्पाचा तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यता अहवाल महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केलेला नाही. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगली उपविभागीय कार्यालयाने आणि कोल्हापूर विभागीय कार्यालयानेही या प्रकल्पाच्या अनुषंगाने काही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प चालविण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिली नाही. मान्यतेचा अर्ज नाकारला आहे, अशी चर्चा आहे.

दरम्यान, प्रकल्प चालविण्यास मान्यतेसाठी पुरेसे प्रयत्न होत नसताना ठेक्याच्या ठरावाची उठाठेव मात्र जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. महापालिकेतील सत्ता खेचून आणण्यासाठी एका सदस्यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून 'आयएमए मिरज'च्या नियुक्तीचा ठराव रद्द केल्याची चर्चा जोरात आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देशला दुय्यम स्थान आणि राजकीय हितसंबंधांना प्राधान्य यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. यामध्ये आता प्रशासनाचीही कसोटी लागत आहे.

ठराव बदलल्याने नगरसेवक चकीत, पण…

महानगरपालिकेत भाजपच्या सत्ताकाळात या प्रकल्पाचा ठेका आयएमए मिरज यांच्याकडून आयएमए पुलाची शिरोली यांना देण्याचा ठराव महासभेत झाला. राष्ट्रवादीचे महापौर झाल्यानंतर हा ठेका परत आयएमए मिरज यांना चालविण्यास देण्याचा ठराव करण्यात आला. दरम्यान, प्रकल्प चालविण्यास 'प्रदूषण नियंत्रण'ची मान्यता घेतली नसल्याकडे लक्ष वेधत आयएमए मिरजची नियुक्ती रद्द करून 'कोकण केअर'च्या नियुक्तीचा ठराव केला. या ठरावाची माहिती समोर आल्यानंतर अनेक नगरसेवक चकित झाले. पण ठोस काहीच झाले नाही. आता पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.

SCROLL FOR NEXT