Latest

सांगली : चंद्रहार की विशाल? उत्सुकता शिगेला

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. सोमवारी रात्री शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत फैसला झाला नाही. शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारी याद्या मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, की काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना मिळणार, याची उत्सुकता आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी सांगलीतून चंद्रहार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानंतर मिरज येथील सभेत उमेदवारीची घोषणा केली. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, ही जागा काँग्रेसला मिळणार आणि विशाल पाटीलच हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा दावा करण्यात आला. प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ, असा इशाराही देण्यात आला. माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील या नेत्यांनी मुंबईत ठाण मांडून सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी मागणी लावून धरली. राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनीही महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगलीसाठी आग्रही भूमिका घेतली. त्याशिवाय दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे जिल्ह्यातील काँग्रेसच्या वस्तुस्थितीची माहिती दिली आहे. सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता दिल्लीत काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे. निवडणूक लढवण्याबाबत ग्रीन सिग्नल मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी सोमवारी जाहीर केली. त्या यादीत 46 उमेदवारांची नावे आहेत. त्यात महाराष्ट्रातील चार जागांचा समावेश करण्यात आला, मात्र सांगलीचा समावेश नव्हता. त्यामुळे कार्यकर्त्यांत धाकधूक आहे. मुंबईत मंगळवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीस काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे सांगलीबाबत चर्चा अथवा निर्णय झाला नाही.
शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्रातील 16 जागा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात चंद्रहार यांचे नाव असेल, असा दावा त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. दुसर्‍या बाजूला काँग्रेसच्या 18 जागांची यादी जाहीर होणार असून, त्यात विशाल पाटील यांचे नाव असेल, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यादीत नाव नसेल तर नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी अनुपस्थित

शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी निश्चित धरून प्रचार सुरू केला आहे. ठीकठिकाणी बैठका, भेटीगाठी सुरू आहेत. सोमवारी तासगाव, पलूस तालुक्यात बैठका झाल्या. मात्र या बैठकीस काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अनुपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT