Latest

सांगलीच्या आखाड्यात ‘पाटील’की कोणाची?

दिनेश चोरगे

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात लढत दुरंगी होणार की तिरंगी? चंद्रहार पाटील यांचा शड्डू शेवटपर्यंत घुमणार का? संजय पाटील जिंकणार की विशाल पाटील? 2019 च्या निवडणुकीत वंचित आघाडीने मिळवलेली सुमारे तीन लाख मते यावेळी कोणाला मिळणार? ती मते यावेळीही एकगठ्ठा मिळतील कशावरून? नैसर्गिक नाराजीचे काय होणार? वसंतदादा घराण्याची पुण्याई किती कामाला येणार? जयंत पाटील घटकाचा प्रभाव किती राहणार? मोदी राज सत्तेचे कार्ड सांगलीत किती चालणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लोकसभा निवडणुकीत यावेळी मिळणार आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी वादग्रस्त झाली, ती लक्षवेधी ठरली. राज्यभर सांगलीच्या जागेची सतत चर्चा झाली. हा वाद मुंबईमधून दिल्लीदरबारीही गेला. त्याचे झाले असे, ठाकरे शिवसेना गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेतले. इतकेच नव्हे तर सांगलीसाठी त्यांची उमेदवारी परस्पर जाहीरही करून टाकली. यानंतर ठिणगी पडली आणि वाद पेटला. तो अजूनही धुमसतोच आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेमध्ये जोरदार धुमशान सुरू आहे. याचे पडसाद निवडणूक प्रचारात, मतदानात अर्थातच निकालामध्येही दिसतील.

शिवसेना गटातर्फे पैलवान चंद्रहार पाटील आखाड्यात उतरल्यामुळे सांगलीतील एकसंध काँग्रेस भलतीच चिडली. काँग्रेस मंडळींनी पक्षाचा नेता म्हणून आमदार, माजी मंत्री, डॉ. विश्वजित कदम यांचे नेतृत्व जाहीरपणे मान्य केले आहे. त्यांच्यासह सर्वांनीच काँग्रेस लढणारच आणि विशाल पाटीलच उमेदवार असतील, ही भूमिका कायम ठेवली. सर्व काँग्रेस मंडळींनी मतभेदाचा इतिहास औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात बुडवलेला आहे, असे त्यांच्या वारंवारच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होते. याचे काही एक श्रेय आमदार विश्वजित यांना जाते.

 सांगलीत पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेस, दादा घराणे यांचा मताचा टक्का लक्षणीय राहिलेला आहे. 2019 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बॅट या निवडणूक चिन्हावर विशाल पाटील यांनी तीन लाखांवर मते घेतली होती, हे येथे लक्षात घ्यायला हवे. काँग्रेस, दादा घराणे आणि स्वाभिमानी चळवळीचा प्रभाव याला कारणीभूत होता. जिल्ह्यातील सहाशेवर गावागावांत काँग्रेसला, दादा घराण्याला मानणारा लोकसमूह आजही आहे. या काँग्रेसजनांची एकसंध मोट आमदार कदम, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, आमदार विक्रम सावंत आदींनी बांधलेली आहे. हाती राजसत्ता नसताना, दहशत आणि प्रलोभने असताना विरोधी अवकाशात ही मोट बांधलेली आहे, हे लक्षात घ्यावेच लागेल.

काँग्रेस चिडलेली असली तरी ठाकरे शिवसेनादेखील आक्रमक आहे. हा आक्रमकपणा कायम आहे. त्यांच्या, विशेषतः खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून ठाकरे शिवसेना माघार घेण्याची चिन्हे दिसत नाहीत. 'उमेदवारीचा विषय संपला' असे ते वारंवार म्हणतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आदेश दिलाच तरच 'ग्रे प्लेस' संभवते. आता मूळ प्रश्न येतो तो चंद्रहार यांनी माघार घेतली नाही तर विशाल पाटील काय करणार? काँग्रेस त्यांना हिरवा कंदील दाखवणार का? 'हात' हे निवडणूक चिन्ह मिळणार का? हात आणि ठाकरे गटाची मशाल यांच्यामध्ये कथित मैत्रीपूर्ण लढत होणार का? काँग्रेसने हिरवा कंदील न दाखवल्यास विशाल पाटील अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यांनीच म्हटले आहे की, आमदार डॉ. विश्वजित कदम हे माझ्या राजकीय गाडीचे चालक आहेत. विश्वजित हे विलक्षण महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांची दूरदृष्टी पाहता ते विशाल यांना अपक्ष म्हणून लढण्यास पाठबळ देतील, असे वाटत नाही. तात्पर्य काय तर सांगलीच्या काँग्रेसच्या गाडीचा चालक आणि उमेदवार बदलाची शक्यता नाही.

या राजकीय नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर लढत तिरंगी आणि उत्कंठावर्धक सामना दुरंगी होण्याची चिन्हे आहेत. भाजपतर्फे खासदार संजय पाटील, काँग्रेसतर्फे विशाल पाटील आणि ठाकरे शिवसेनेतर्फे चंद्रहार पाटील लोकसभेसाठी परीक्षा देतील. संजय पाटील म्हणजेच 'काका' आणि विशाल पाटील म्हणजेच 'दादा' यांच्या तुलनेत पैलवान चंद्रहार कोरी पाटी घेऊन कुस्ती खेळणार आहेत. भाजप आणि काँग्रेस बरोबर त्यांना डाव टाकावयाचे आहेत. त्यांचा फायदा-तोटा भाजप आणि काँग्रेसला कसा होणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे तर्कवितर्क निकालानंतरही सुरू राहतील. मागील दोन निवडणुकांप्रमाणे यावेळीही आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेची चर्चा यावेळीही आहे. खासदार संजय राऊत विचारतात, महाविकास आघाडीत राहून भाजपला अप्रत्यक्ष मदत कोण करू इच्छिते? हा 'अप्रत्यक्ष'वाला कोण, याची चर्चा सुरू आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचित आघाडी प्रमाणे या निवडणुकीत अन्य घटक नाहीत हे नक्की. संजय पाटील यांच्यामागे प्रचंड राजसत्ता आहे. नैसर्गिक नाराजी, विकासाचे गंभीर प्रश्न आणि भाजपअंतर्गत विरोध याचा ते सामना करणार
आहेत. त्यांचा हरेक तालुक्यात 'काका' म्हणून स्वतःचा गट आहे. त्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष आहे. कुस्तीसाठी प्रसिद्ध असणार्‍या सांगलीच्या आखाड्यात तीन 'पाटील' उतरलेत. सांगलीकर सांगलीची 'पाटील की' कोणाला देणार, 'काकांना' की 'दादांना' पाहावे लागेल. तूर्त इतकेच.

SCROLL FOR NEXT