Latest

सांगली : जत पोलिसांना ‘कोणी घर देता का घर’!

Shambhuraj Pachindre

जत शहर : पुढारी वृत्तसेवा : जत पोलिस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचार्‍यांची निवासस्थाने जीर्ण व मोडकळीस आली आहेत. गेली चार-पाच वर्षे ही निवासस्थाने कुलूपबंद आहेत.जत पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अपार्टमेंटचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे जत पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर 'कोणी घर देता का घर' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

जत पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांना गेली तीन, चार वर्षे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जत पोलिस ठाण्याकडे एकूण 70 पोलिस कर्मचारी व पाच पोलिस अधिकारी कार्यरत आहेत. निवासाअभावी हे सर्व कर्मचारी जत शहरात भाड्याने घरे घेऊन रहात आहेत. सध्या जत पोलिस लाईनमध्ये 27 पोलिस कर्मचारी निवासस्थाने असलीतरी ती जीर्ण व मोडकळीस आली आहेत. त्यामुळे ती कुलूपबंद आहेत. राज्यात पोलिस ठाण्याजवळच पोलिसांची निवासस्थाने आहेत. परंतु जत येथील संस्थानकालीन पोलिसलाईन जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने या पोलिसलाईनमध्ये सध्या कोणीही अधिकारी व कर्मचारी रहात नाहीत.

अनेक वर्षे ही घरे बंद असल्याने साप, घुशी व उंदरांचे वास्तव्य आहे. जत नगरपरिषदेकडील जत-सांगली मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेली नळपाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने या पाईपलाईनचे पाणी पोलिस लाईनमध्ये शिरले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून चिखल साचला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काटेरी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे या वसाहतीला विद्रुप स्वरूप आले आहे.

जत पोलिस ठाण्याने जीर्ण झालेली व मोडकळीस आलेली पोलिस लाईन पाडून त्या ठिकाणी जत अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता अपार्टमेंटचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवूनही प्रशासन त्याची दखल घेण्यास तयार नाही.

आमदारांनी निधी उपलब्ध करून द्यावा

जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT