Latest

सांगली : अनैतिक संबंधास अडसर; खरसुंडी येथे पतीचा खून, गळफासाने आत्महत्येचा केला बनाव

स्वालिया न. शिकलगार

खरसुंडी : पुढारी वृत्तसेवा

आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पती सतीश उत्तम धुमाळ (वय 31, रा. म्हसवड, सध्या रा. खरसुंडी) याचा त्याची पत्नी व तिच्या नातेवाईकांनी खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

याबाबत अनुराज नंदकुमार पवार (रा.म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पत्नी चंदा सतीश धुमाळ, मेव्हणा चेतन बलभीम वाडेकर, साडू अतुल पवार, मेव्हणी मोनिका अतुल पवार (सर्व रा. खरसुंडी) या चौघा संशियतांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सतीश धुमाळ हे गेल्या काही वर्षांपासून खरसुंडी येथे मेहुणे चेतन वाडेकर याच्याकडे राहत होते. तेे मोलमजुरी व रंगकाम करत होते. पत्नी चंदा हिचे अन्य व्यक्‍तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सोमवारी रात्री दोघा पती पत्नीत वाद झाला.

दरम्यान, संशयितांनी सतीश याला बेदम मारहाण केली. मारहाणीत सतीश यांच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी सतीश यांनी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव केला.

मात्र मंगळवारी सकाळी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत आटपाडी पोलिसांशी संपर्क केला. सतीश याचे नातेवाईक म्हसवड येथून आल्यानंतर त्यांनी संशय व्यक्त केला. सतीश यांचा भाचा अनुराज पवार याने याप्रकरणी संशयितांविरोधात आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

SCROLL FOR NEXT