सांगली : सुरेश गुदले सांगली जिल्हा सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. रब्बीच्या सुमारे 45 ते 50 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. या पेरण्यापैकी निम्मे पीक हाताला लागले तरी खूप झाले, अशी स्थिती आहे. याचे कारण पावसाने ओढ दिली आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापत आहे. खरीप हंगामातील पिकेच करपू लागलीत. त्यामुळे रब्बीचीही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी ऑगस्ट कोरडा गेला. आता सप्टेंबरमध्ये तरी भरपूर पाऊस पडेल, अशी आशा बाळगण्याखेरीज शेतकरी करू तरी काय शकतो?
सांगली जिल्ह्याचा पश्चिमेचा अंदाजे तीस टक्के भाग सुकाळ तर पूर्वेचा अंदाजे सत्तर टक्के भाग म्हणजे दुष्काळ. हे चित्र बदलायला आपल्या महान राज्यकर्त्यांना चाळीस वर्षे लागली. चाळीस वर्षे म्हणजे आठ निवडणुका. या समीकरणात बदल झाला नाही असे नाही. ताकारी, टेंभू, म्हैशाळ, आरफळ, विसापूर-कुणदी आदी योजनांचे पाणी पश्चिम भागात काही ठिकाणी पोहोचले, राहिलेल्या ठिकाणीही पोहोचेल, असे आश्वासन राज्यकर्त्यांना पुन्हा पुन्हा द्यावे लागते आहे. पुर्वानुभव पाहता संपूर्ण जिल्हा सिंचनाखाली येण्यास अजून चार निवडणुकांचा कालावधी म्हणजे किमान वीस वर्षे लागू शकतात. तीन-चार वर्षांत चांगला पाऊस झाला, यंदा मात्र देशाच्या पूर्वेकडील पावसाने उडवलेली दाणादाण टीव्हीवर बघत बसावी लागली. पाऊस झालाच नाही तर दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढेल.
जिल्ह्यात धान्य मका भात आधी पिकांची 90, बाजरी 53, खरीप ज्वारी केवळ 24 तूर 48 टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कडधान्याचे 40 हजार 528 हेक्टर सरासरी क्षेत्र असते. त्यापैकी केवळ 13351 हेक्टर म्हणजे 33 टक्के क्षेत्रातच पेरणी आहे. सोयाबीनचे एक लाख 78 हजार 54 हेक्टर क्षेत्र असते. त्यापैकी 86 हजार 738 हेक्टर म्हणजे 49 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे.
कोयना आणि चांदोली या दोनच धरणांचा जिल्ह्याला आधार आहे. सध्या नद्या, नाले, ओहोळ यांची स्थिती कुपोषषित बालकांसारखी झालेली आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याची मागणी सतत होेते आहे.
सध्या जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत, वाड्या वस्त्यांवर टँकरने पिण्याचे पाणी पुरवले जाते. जत तालुक्यात 19 गावांत 24 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. आटपाडी तालुक्यात चार हजारांवर नागरिकांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो.
जिल्ह्यात 14 लाख 3 हजार 600 पशुधन आहे. त्यांना चारा पुरविताना सध्याच नाकीनऊ येते आहे. पावसाने साथ दिलीच नाही तर चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू शकते. चारा छावण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.