Latest

सांगली : कोयना धरणातून विसर्ग थांबवला; पुन्हा उपसा बंदी

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे कोयनेतून विसर्ग थांबवला आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्याने कृष्णा नदीतून सिंचनासाठी पुन्हा उपसा बंदी जाहीर केली आहे. हा आदेश 26 जूनपर्यंत लागू आहे. सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी ही माहिती दिली.

त्या म्हणाल्या, वारणा, कोयना धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. पाऊस अजूनही सुरू झालेला नाही. यामुळे उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीवरील टेंभू बॅरेज ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत पुन्हा एकदा उपसा बंदी जाहीर केली आहे. पिण्याचे पाणीपुरवठा करणार्‍या योजना मात्र सुरू राहणार आहेत. उपसा बंदी शुक्रवार, 23 जून रात्री बारा वाजल्यापासून सोमवार, 26 जून रात्री बारापर्यंत असणार आहे.

त्या म्हणाल्या, पर्जन्यमानानुसार व स्थितीनुसार पुढील नियोजन केले जाईल. या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास संबधीतांचा पाणी व वीज पुरवठा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द केला जाईल. उपसा संच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करणेत येणार आहे. उपलब्ध होणार्‍या पाण्यावर कृष्णा नदीवरील लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त उभ्या पिकांचे नुकनास होऊ नये, या दृष्टिने नियोजन करून जलसंपदा विभागास सहकार्य करावे. धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबधीतांनी याची दक्षता घेऊन पाणी प्रदूषण टाळावे, अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

SCROLL FOR NEXT