Latest

विशाल पाटील यांच्यामुळे सांगलीचा सामना लक्षवेधी

Arun Patil

सांगली लोकसभा मतदार संघाची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, यावरून वाद सुरू झाला आणि सांगली सर्वदूर चर्चेच्या केंद्रस्थानी आली. पैलवान ठरण्यापूर्वीच सांगलीचा आखाडा राज्यभर लक्षवेधी ठरला. महाविकास आघाडीत सांगलीची जागा कोणाला मिळणार? ठाकरे शिवसेनेला की काँग्रेसला? हा कळीचा प्रश्न ठरलेला. काही एक चर्चा झडतानाच ठाकरे शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेतले. इतकेच नव्हे, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेत सभा घेऊन चंद्रहार यांची उमेदवारीही परस्पर आणि गतीने जाहीर केली. झाले, हे होईपर्यंत काहीशी बिनघोर असलेली काँग्रेस कामाला लागली. एकूण निवडणूकच 'हलक्यात' घेतलेल्या भाजपनेही कान टवकारले आणि तोही कामाला लागला. याचे कारण रस्ता खडतर झाला.

काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेत सांगलीच्या जागेवरून चांगलीच जुंपलेली. त्याचे कवित्व अजूनही सुरूच आहे. निकालानंतरही ते सुरूच राहील, नंतर इतिहासाच्या पानावर स्थिरावेल. सध्या तरी अर्ज माघार घेण्याच्या दिवसापर्यर्ंत काही बदल होऊ शकतो, असा ताणून-ताणून लावलेला तर्क अजूनही ऐकू येतो. त्याला 'राजकारणात काहीही अशक्य नसते,' अशा लोकप्रिय सिद्धांताची जोड दिली जाते. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद-संवाद अजूनही सुरू आहे. उत्तर मध्य मुंबईची जागा ठाकरे शिवसेनेने घ्यावी आणि त्याच्या बदल्यात सांगलीची जागा काँग्रेसला द्यावी, असा प्रस्ताव होता. तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता, परंतु तो फेटाळण्यात आला. ही शक्यता धूसरच होती आणि घडलेही तसेच.

सांगलीच्या जागेवरून तणातणी सुरू असताना भाजपने सर्वप्रथम विद्यमान खासदार संजय पाटील यांना तिसर्‍यांदा उमेदवारी जाहीर केलेली. त्यांच्या पहिल्या यादीत खासदार पाटील यांचे नाव झळकलेले. लागलीच त्यांनी प्रचारही सुरू केलेला, पण मंडळी होती 'रिलॅक्स' , कारणेही तशीच होती. पहिले पंधरा ते वीस दिवस वातावरण असे होते, की खासदार संजय पाटील आणि पैलवान चंद्रहार पाटील यांच्यातच रंगणार कुस्ती. दोघेही पैलवान. या कुस्तीचा निकाल काय लागणार, तेही सांगलीकरांनी ठरवून टाकलेले. समाजमाध्यमात विजयाच्या, पराभवाच्या छबी सामायिक केल्या जात होत्या. सुरू होते जय हो…

या चित्राला छेद दिला गेला. झालेले काय, तर 'आपले मैदान, आपली कुस्ती सोपी आहे,' असे खासदार संजय पाटील, भाजप आणि समर्थक, कार्यकर्त्यांनी 'फायनल' करून टाकलेले. तशी स्पष्ट कबुलीही स्वतः खासदार पाटील यांनी सांगलीत जाहीर सभेत दिली. 'आमचे कार्यकर्तेही सुरुवातीला निश्चिंत राहिलेले होते,' असे होते त्यांचे शब्द. सांगलीची लढत एकतर्फी होती, असे त्यांना म्हणावयाचे होते. संदेशही तसाच पोहोचलेला.

सांगलीच्या या चित्राला ठिणगी लावली ती काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले आणि जागाच काँग्रेसच्या वाट्याला न मिळालेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी. सांगलीची जागा काँग्रेसला काही मिळत नाही, असे यातायात केल्यानंतर काँग्रेसजनांची भावना झाली. ठरले, विशाल यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एक अपक्ष आणि दुसरा काँग्रेसतर्फे. त्यानंतर सांगलीची सामना झाला तिरंगी. काँग्रेसचे बंडखोर विशाल, भाजपचे संजय आणि महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे चंद्रहार यांच्यातील सामना. संजय यांना म्हणतात काका, विशाल यांना दादा, तर चंद्रहारना पैलवान. यांच्यातील कुस्ती आता उत्कंठावर्धक झाली.

वसंतदादा घराणे ही जमेची बाजू

जागेवरून महाराष्ट्रभर बहुचर्चित झालेली सांगली लढतीवरूनही राज्यभर ठरली लक्षवेधी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा नातू असलेल्या विशाल यांना उमेदवारी मागण्याची वेळ येते, हा मुद्दा लोकांत भावनिक ठरला, ठरवला गेलाही. जे वसंतदादा सांगलीतून अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करायचे, उमेदवारीचे वाटप व्हायचे, त्यांच्या नातवाला उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीच्या वार्‍या करण्याची वेळ आली… यासारखे भावनिक मुद्दे प्रचारात आणले गेले. साहित्यिक विश्वास पाटील यांनीही आपल्या शब्दसेवा विशाल यांच्या बाजूने खर्ची घातली. तात्पर्य काय तर बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसवर अन्याय होतोय, ही भावना सर्वदूर पसरलेली आहे. विशाल यांच्यासाठी ही जमेचीच बाजू.

…आणि चित्रात रंग भरला

लोकभावनेचा दबाव, जिल्हा काँग्रेसचा आग्रह पाहता विशाल पाटील यांचे माघारीचे दोर आता कापलेले आहेत. विशाल पाटील बंड करणार का? ते लढणार का? यासारखे प्रश्न बघता-बघता मागे पडले. त्यांनीच 'आता लढणारचं,' असे जाहीर केले. झाले, चित्रामध्ये विलक्षण रंग भरू लागला. निश्चिंत असलेले खासदार संजय पाटील, त्यांचा गट, भाजप, संघ महायुतीमधील अन्य घटक पक्ष सारे कामाला लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सांगलीत येऊन प्रचाराच्या तोफा लावून गेले. 'साधा एक साखर कारखाना चालवता येत नाही राव आणि चालला खासदार व्हायला,' यासारखी अजित पवार यांची दोन वाक्यांचीच शेरेबाजी बातमीतील चौकट होण्याऐवजी हेडलाईन झाली. राजकारणाची ही बदलती परिभाषा.

…आता मिळणार विकासाची थाळी

महायुतीच्या नेत्यांनी सांगलीत धाव घेतली… घ्यावी लागली… कारण विशाल पाटील यांचा महामेळावा. सांगली जिल्ह्यातून लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या मेळाव्याला आले होते. हजारोंच्या संख्येने लोक आलेले, त्याला तशीच गर्दी जमवून 'जशास तसे' उत्तर देण्याचा प्रयत्न महायुतीने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर लोकांना मते देण्याचे आवाहन केले. मोदी यांचा दहा वर्षांतील कारभार म्हणजे 'स्टार्टर' आहे, विकासाची 'मुख्य थाळी' येत्या पाच वर्षांत मिळणार आहे, असे आश्वासन फडणवीस यांनी जाहीर सभेत दिले. या सार्‍या घडामोडींची ही लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे.

गट-तटांचा टक्का लक्षणीय

सांगली जिल्ह्यात दहा तालुके आणि आठ विधानसभा मतदारसंघ. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान तीन ते पाच गट. त्यापैकी किमान तीन गट प्रबळ. पक्ष, विचार म्हणून नव्हे तर स्थानिक राजकीय सत्ता, सत्ताकारण आणि लाखमोलाचे अर्थकारण. तालुक्याच्या ठिकाणी या गटांची चाल कशी राहते, त्यावरही ठरते निकालाची दिशा. यापूर्वी तसे झाले. हे गट पक्षांची लेबल्स प्रसंगी लावतातही; पण लाडका नेता जे सांगेल, त्या रस्त्यावर चालतात. कवठेमहांकाळ तालुक्यात तसेच मिरज पूर्व भागातही माजी मंत्री अजितराव घोरपडे, जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप, तासगावात आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील तसेच आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील, पलूस-कडेगावात आमदार विश्वजित कदम आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आटपाडीत राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, खानापुरात माजी आमदार अनिल बाबर गट अशी काही उदाहरणे सांगता येतात. या गटांचा मतदानाचा टक्का लक्षणीयच. ते मंचावर एकीचे दर्शन देतात, हातात हात घालून, हाताची साखळी उंचावत पब्लिकला अभिवादन करतात. मंचावरून उतरले की शिव्या घालत भलताच उद्योग करतात. त्यालाच सामान्य माणूस राजकारण समजून बसतो. तात्पर्य काय, तर अशा गटांची भूमिक महत्त्वाची.

'ये पब्लिक है…'

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे पाठबळ कोणत्या पैलवानाला, परिणामी कोणत्या पैलवानाला होणार फायदा याची चर्चा आहे. त्याला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यातील मतभेदाचा वारसा आहे. याबाबत आमदार पाटील यांनी 'भूतकाळात रमू नका, भविष्याचा वेध घ्या, दादा-बापू वरती एकत्रित चहा पित असतील,' अशा शब्दांत नेहमीप्रमाणे स्मितहास्य करत उत्तर दिले. सांगलीबाबत माझी बदनामी का करता, अशी त्यांची विचारणा. खासदार संजय पाटील, पैलवान चंद्रहार पाटील आतापर्यंत एकमेकांविषयी काही बोलले नाहीत, मग आरोप-प्रत्यारोप तर दूरच. दोघांचेही आमदार जयंत पाटील यांच्याशी चांगले सख्य. असो, 'ये पब्लिक है…' त्यामुळे होते काय चर्चेचा धूर निघतोे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT