Latest

Sangali News : शेंडेवाडीत साजरा होतोय ‘दारूबंदी’चा वाढदिवस…

दिनेश चोरगे

मांगले : सध्या सर्वत्रच विविध प्रकारचे वाढदिवस साजरे करण्याचे फॅड आहे. मात्र मांगलेतील चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या शेंडेवाडी वसाहतीमध्ये शुक्रवारी (दि. 5) चक्क 'दारूबंदी'चा 42 वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यानिमित्त गणेश मंदिरासमोर महाप्रसादाचेही वाटप करण्यात येणार आहे. (Sangali News)

Sangali News : 'दारूबंदी'चा वाढदिवस…

व्यसनामुळे समाजातील लोकांचे फार हाल होतात. दारू, गुटखा, तंबाखू, मादक पदार्थाच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो. या सर्वाला मांगलेतील शेंडेवाडी वसाहत मात्र अपवाद ठरत आहे. सन 2000 साली चांदोली अभयारण्यामुळे मांगलेत विस्थापित झालेल्या शिराळा तालुक्यातील खुंदलापूरअंतर्गत असलेल्या शेंडेवाडी वसाहतीमध्ये 1982 पासून दारूबंदीचा उपक्रम राबवला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. 1982 पूर्वी या गावात दारूच्या व्यसनाचा अतिरेक झाला होता. गावातील अनेक कुटुंबे व्यसनांच्या आहारी गेली होती. त्यावेळी तेथील कोंडीबा बांबवडे, लक्ष्मण किंजळकर व अन्य मंडळीनी गावाला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी एक अनोखी प्रथा सुरू केली.

त्यांनी गुढीपाडव्याच्या अगोदर तीन दिवस धनिष्ठा नक्षत्रावर गावातील सर्व लोकांना एकत्रित केले. त्यांना व्यसनामुळे होणारा तोटा सांगितला. त्यावेळी सर्वांनी व्यसनमुक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मनाला लगाम घालण्याच्या उद्देशाने गावाच्या मध्यभागी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्या गणरायासमोर 18 वर्षावरील सर्वांनी दारू न पिण्याची शपथ घेतली. त्या दिवसापासून हे गाव आजअखेर व्यसनापासून मुक्त आहे.

दारूबंदीला सुरुवात झालेल्या दिवसाची आठवण सदोदित राहावी या उद्देशाने प्रतिवर्षी फाल्गुन महिन्यातील धनिष्ठा नक्षत्रावर दारूबंदीचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा 42 वर्षापासून आजअखेर सुरू आहे. या गणपतीसमोर यादिवशी 18 वर्षावरील तरुणांच्या दारू न पिण्याच्या शपथा घेण्याची प्रथा आहे. ती आता देखील पाळण्यात येते. त्यानंतर महाआरती, प्रसाद व भजनाचा कार्यक्रम पार पडतो. यानिमित्त गावाची जणू यात्राच असते. मेवामिठाई, खेळण्याची दुकाने याने वसाहत गजबजलेली असते. त्याचबरोबर याप्रसंगी मुंबईला तसेच परगावी असलेले ग्रामस्थ उपस्थित असतात. रात्री प्रबोधनपर भजनाचा कार्यक्रम पार पडतो .

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT