Latest

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर दुर्घटना, १८ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : समृद्धी महामार्गावर शहापूर (जि. ठाणे) तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी आज पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने १८ मजूर ठार झाले आहेत. तर ३ जण गंभीर जखमी झाले.  क्रेन आणि स्लॅबखाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या आणि डॉग स्कॉड देखील घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास देखील समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी शाहपूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर आणि क्रेन अचानक कोसळली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन खाली असलेल्या मजूरांवर कोसळली. यात १८ मजूरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. १८ मृतदेह हे शहापूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तर तीन जण जखमी मजुरांवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर 2 जखमी वर ज्युपिटर हास्पिटलला हलविण्यात आले असून एक जन शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलला उपचार घेत आहेत.

आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री शिंदे पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफचे पथक याठिकाणी पोहचले असून बचावकार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. "शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत ३ कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." असे फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT