Latest

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींनी बोलावली खासदारांची बैठक

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत एकमताने आवाज उठवावा, यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक बोलावली आहे. (Maratha Reservation) येत्या १८ डिसेंबरला ही बैठक बोलावण्यात आली आहे. (Maratha Reservation)

संबंधित बातम्या –

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेली डेडलाईन जवळ येत आहे. संसदेतही काही खासदारांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशनातही याच प्रश्नावर चर्चा सुरू आहे. आता याच प्रश्नावर राज्यसभेचे माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी अशाच प्रकारची बैठक शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिल्लीत बोलावली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मागासवर्ग आयोगासोबत बैठक घेतली होती. मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेवून सविस्तर चर्चा केली होती.

मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर मागास सिद्ध करण्यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आयोगाला मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

SCROLL FOR NEXT