Latest

समरजित घाटगे यांनी घेतली फडणवीस यांची भेट

Arun Patil

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या नव्या राजकीय घडामोडीच्या नाट्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपद मिळविले. याचे पडसाद कागल तालुक्यातील भाजपमध्ये उमटले असून कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी याबाबत मौन पाळले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी घाटगे यांनी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, पण या भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

भाजप-शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांचा गट सामिल झाला. या गटाला 9 मंत्रिपदे मिळाली. यात आ. मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळविले. त्यामुळे मुश्रीफ गटात चैत्यन्य पसरून फटाक्यांची आतषबाजी झाली. तर भाजप कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता पसरली होती. घाटगे यांनी निवडक कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली. मंगळवारी दुपारी त्यांनी मंत्रालयात भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राजकीय घडामोडीबाबत चर्चा झाली पण या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. सविस्तर चर्चा पुन्हा दोन दिवसांनी होणार असल्याचे समजते.

घाटगे बुधवारी मुंबईवरून परत येणार असून गुरुवारी ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावरही चर्चा !

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे कार्यकर्त्यांपासून नॉट रिचेबल राहिल्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या भूमिकेची उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. 'माय सपोर्ट राजे' व 'माझा नेता, माझा अभिमान' अशा पोस्टही व्हायरल होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT