Latest

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर वाढली नॉस्त्रेदेमसच्या पुस्तकाची विक्री

Arun Patil

लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्त्रेदेमसच्या पुस्तकाची विक्री वाढल्याचे दिसून आले आहे. असे म्हटले जाते की 450 वर्षांपूर्वीच नॉस्त्रेदेमसने आपल्या पुस्तकात ब्रिटनच्या या महाराणीच्या निधनाबाबतचीही भविष्यवाणी लिहून ठेवली होती. लंडनची 'ग्रेट फायर' म्हणून ओळखली जाणारी भयानक आग तसेच हिटलरच्या उदयाबाबतची भविष्यवाणीही नॉस्त्रेदेमसने लिहिली होती असे म्हटले जाते. नॉस्त्रेदेमसची भविष्यवाणी व त्याबाबतच्या स्पष्टीकरणाच्या पुस्तकाची नोंद 'संडे टाईम्स'च्या 'बेस्टसेलर' पुस्तकांच्या सूचीत झाली आहे.

मारियो रीडिंगचे पुस्तक 'नॉस्त्रेदेमस : द कंप्लिट प्रोफेसीस फॉर द फ्यूचर' या पुस्तकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संडे टाईम्सच्या रिपोर्टनुसार महाराणीच्या निधनानंतर 17 सप्टेंबरपासून एका आठवड्यातच या पुस्तकाच्या 8 हजार प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक सामान्य पेपरबॅक चार्टमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आले आहे. राणीच्या निधनापूर्वी या पुस्तकाच्या आठवड्यातून पाच प्रती विकल्या जात असत. 2006 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्यामध्ये नॉस्त्रेदेमसच्या भविष्यवाणीवर भाष्य करण्यात आले आहे.

या पुस्तकाच्या तडाखेबाज विक्रीमागे सोशल मीडियामुळे मिळालेली लोकप्रियता असल्याचे सांगितले जाते. अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की नॉस्त्रेदेमसने राणीचे निधन, युक्रेन युद्ध याबाबतही भविष्यवाणी केली होती. नॉस्त्रेदेमसची ही भाकिते गूढ, काव्यमय भाषेत आहेत. त्याचे सर्वात लोकप्रिय पुस्तक 'लेस प्रोफेसीज'मध्ये 942 काव्यपंक्ती आहेत.

या पंक्तींमधूनच भविष्यवाणी केलेली असल्याचे मानले जाते. नॉस्त्रेदेमसचा जन्म सन 1503 मध्ये फ्रान्सच्या मिशेल डी नास्त्रेदेम येथे झाला. तो आपल्या हयातीतच एक विख्यात भविष्यवेत्ता होता. त्याने माणूस चंद्रावर जाईल यापासून ते 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचीही भविष्यवाणी केल्याचे म्हटले जाते. त्याच्या या भविष्यवाणीवर पुस्तक लिहिणारे मारियो रीडिंग आज पुस्तकाचे यश पाहण्यासाठी जिवंत नाहीत. 2017 मध्ये वयाच्या 63 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

SCROLL FOR NEXT