नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत डान्स पार्टी प्रकरणात शिवसेना-ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजपचा पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरेवर गुन्हा का नाही? असा सवाल ठाकरे गटासह विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. आता भाजपच्या मोरेवर गुन्हा दाखल झाल्याने आता सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांच्या आडगाव हद्दीतील हिंदुस्थानगरमधील फार्म हाऊसवर पार्टी करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सलीम कुत्ता, सुधाकर बडगुजर यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नीतेश राणे यांनी दाखवून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखेने बडगुजर यांची चौकशीही केली होती. या चौकशीतून कुत्ता समवेतच्या डान्स पार्टीमध्ये सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे हा देखील उपस्थित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मोरे याचीही पोलिसांनी चौकशी केली होती. दरम्यान, सलीम कुत्ता, सुधाकर बडगुजर, व्यंकटेश मोरे यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्य केल्याच्या कलमान्वये आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे सराईत गुन्हेगार असून, गेल्यावर्षी सुनील वाघ खून प्रकरणात मोरे यास न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यात सध्या तो जामीनावर बाहेर आला आहे.
सलीम कुत्ता डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर, व्यंकटेश माेरे यांच्यासह इतर राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते एकमेकांवर करीत आहेत. सलीम कुत्ता यास पॅरोलवर सोडविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते नीतेश राणे यांनी यापूर्वीच केला आहे. त्यामुळे याप्रकरणात आता नंबर कोणाचा? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
हेही वाचा :