Latest

Sakshi Malik Retired : साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती! WFI च्या नव्या अध्यक्षाच्या निवडीने नाराज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक यापुढे पुन्हा कधीही कुस्ती खेळताना दिसणार नाही. तिने गुरुवारी अचानक निवृत्ती जाहीर केली. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची निवड झाल्यानंतर साक्षीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या या निर्णयाची घोषणा केली.

ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या विरोधात आंदोलन

एका अल्पवयीन कुस्तीपटूसह सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याबाबत पैलवानांनी जोरदार निदर्शने केली होती. साक्षी त्या चळवळीचा एक भाग होती. निवृत्तीची घोषणा करताना ती म्हणाली की, मी मनापासून अन्याविरुद्ध लढाई लढली, पण ब्रिजभूषण यांच्यासारख्या व्यक्तींच्या हाती डब्ल्यूएफआयचा कारभार राहिल्याने मी कुस्तीतून निवृत्ते होत आहे.' या वक्तव्यानंतर साक्षी ढसाढसा रडू लागली.

भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय सिंह विजयी

संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा 40 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला. कुस्ती महासंघाची निवडणूक गुरुवारी (20 डिसेंबर) पार पडली. त्यानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. प्रदीर्घ काळ महासंघावर राज्य करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंह यांचे ते निकटवर्तीय आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे का होईना, भारतीय कुस्तीत ब्रिजभूषण यांचा दबदबा कायम राहिला आहे. डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदासह एकूण 15 पदांसाठी ची गुरुवारी (21 डिसेंबर) निवडणूक झाली. त्यानंतर लगेचच मतमोजणी पार पडली. यात संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव करत बाजी मारली.

कोण आहेत संजय सिंह?

डब्ल्यूएफआयचे नवे अध्यक्ष संजय सिंह हे 'बबलू' या टोपण नावाने ओळखले जातात. उत्तर प्रदेशातील कुस्ती संघटना आणि राष्ट्रीय कुस्ती संघटना या दोन्ही संस्थांमध्ये ते पदाधिकारी राहिले आहेत. 2019 मध्ये, त्यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या कार्यकारी समितीमध्ये सहसचिव म्हणून निवड झाली. ते मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य वाराणसीमध्ये आहे. 2008 मध्ये ते वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष तर 2009 मध्ये राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष झाले. ते ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात.

निवडणुकीनंतर डब्ल्यूएफआयची प्रतिमा सुधारेल

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीच्या जागतिक संस्थेने ऑगस्ट 2023 मध्ये डब्ल्यूएफआयचे निलंबन केले होते. निर्धारित मुदतीत निवडणुका न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान निवडणुका पार पडल्याने आता डब्ल्यूएफआयवरील बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोध अनिता शेओरान कोण आहेत?

अनिता शेओरान या ब्रिजभूषण सिंह यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. त्यांनी कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात ब्रिजभूषण यांच्याविरोधात साक्ष दिली होती. अनिता यांनी कुस्ती क्षेत्रातही मोठे यश मिळवले आहे. त्यांनी 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अनिता शेओरान यांनी ही निवडणूक जिंकली असती तर भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली असती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT