Latest

Sajay Raut : संजय राऊत यांच्या दौर्‍यामुळे ठाकरे गट चार्ज

दिनेश चोरगे

कराड; पुढारी वृत्तसेवा : Sajay Raut : राज्य पातळीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खंदे फलंदाज खा. संजय राऊत यांचा रोजच राजकीय 'सामना' पाहायला मिळतो. पाटण तालुक्यातील दौर्‍यात त्यांनी विद्यमान शिवसेना – भाजप युतीचे सरकार व स्थानिक राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा ठाकरे स्टाईल खरपूस राजकीय समाचार घेतला. ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसलाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय कानमंत्र, ऊर्जा देण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाविकास आघाडीच्या दृष्टीने खा. राऊत यांचा दौरा फायदेशीर ठरणार का, हे पाहणे उचित ठरेल.

शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीच्या राजवटीत पाटण तालुक्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीसह काँग्रेस व निष्ठावंत ठाकरे गटाच्या मुळच्या शिवसैनिकांची राजकीय गोची पहायला मिळत होती. मात्र एक वर्षापूर्वी शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर मात्र तालुक्यातील राष्ट्रवादी, ठाकरे गटासह काँग्रेसलाही चांगलीच राजकीय पालवी फुटली. मुळातच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर व ना.देसाई या दोनच गटात विखुरलेल्या पाटण तालुक्यात नेहमीच अन्य पक्ष, संघटनांना त्या तुलनेत महत्व कमी असते. मात्र गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील एकजूट निश्चितच भविष्यातील सकारात्मक नांदी मानली जात आहे. राजकीय व शासकीय, प्रशासकीय सत्तास्थाने असलेल्या ना. देसाईंच्या राजकीय ताकतीला रोखायचे असेल तर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष व मित्र पक्षांनी एकत्रितपणे सामना करणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे. तसे न झाल्यास भविष्यात याचा यातील सर्वांनाच राजकीय फटका बसणार आहे. Sajay Raut

राज्यात भलेही शिवसेनेसोबत भाजपाही सत्तेत असली तरी पाटण तालुक्यात मात्र भाजपाची अवस्था तितकीशी प्रभावी नाही याची प्रचिती नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यातही आली. तालुक्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अपेक्षित ताकद, न्याय व सत्तेतील वाटा मिळत मिळत नसल्याच्या कुरबुरी आहेत.

खा. संजय राऊत यांना भलेही शिवसेना शिंदे गट व भाजपा नेते सकाळचा भोंगा म्हणून हिनवत असले तरी देखील खा.राऊत यांचे सातारा जिल्ह्यातील मिळावे, बैठका व पत्रकार परिषदेतही त्यांनी शिंदे सरकारसह ना. देसाई यांच्या गद्दारीचा खरपूस समाचार घेतला आहे. गद्दारी, खोके, निष्ठा यामुळे लावलेला राजकीय बट्टा यासह पालक, बालक, चालक, मालक अशा पद्धतीने पालकमंत्री पदाची उडवलेल्या खिल्लीमुळे येथे राजकीय घमासान होणार हे नक्कीच. Sajay Raut

याशिवाय मल्हारपेठ येथे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या ठाकरे व राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची एकत्रित असलेली मल्हारपेठ ग्रामपंचायतीची सत्ता, त्याचा संपत आलेला कार्यकाळ व त्याच निमित्ताने महाविकास आघाडीचे भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर व खा. संजय राऊत यांच्या एकत्रित व्यासपीठावर दोन्ही नेत्यांकडून ना. देसाई यांच्यावरील शिरसंधान लक्षात घेता महाविकास आघाडीला बळकटी मिळत असल्याचे राजकीय चित्र पहायला मिळत आहे.

यावर शांत बसतील ते ना.शंभूराज देसाई कसले. त्यामुळे तेही याचा कडाडून राजकीय समाचार घेतील. यामध्ये खा.राऊतांसह महाविकास आघाडी, त्यांचे स्थानिक नेते यांचाही राजकीय समाचार घेतल्याशिवाय ना. देसाई शांत बसणार नाहीत. निश्चितच पाटण तालुक्यात सध्या एका बाजूला ना. देसाई यांच्या राजकीय, शासकीय व प्रशासकीय दबदबा वाढत असतानाच त्याला खा . संजय राऊतांच्या दौर्‍याने काहीसा छेद देण्याचा राजकीय प्रयत्न झाला आहे. हा प्रयत्न भविष्यकाळात महाविकास आघाडीसाठी कितपत फायदेशीर ठरणार याकडे सार्वत्रिक नजरा लागल्या आहेत.

Sajay Raut : मल्हारपेठ ग्रा.पं. राजकीय केंद्रबिंदू ठरणार

ना. शंभूराज देसाईंचा मल्हारपेठ हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मल्हारपेठ ग्रामपंचायतीत राजकीय स्थित्यंतरे पहायला मिळतात. कित्येकदा पाटणकर गटाकडे या ग्रामपंचायतीची सत्ता राहिली आहे. सध्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या पत्नी सौ. धनश्री कदम या सरपंच तर पाटणकर गटाकडे उपसरपंच पदासह बहुमत आहे.त्यामुळे यावेळी ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध देसाई गट अशी दुरंगीच होईल. या विभागात मल्हारपेठ ग्रामपंचायत राजकीय केंद्रबिंदू ठरणार हे निश्चित.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT