Latest

‘भानुदास एकनाथ”च्या जयघोषाने दुमदुमला भिमातीर; कौठाळीत नाथांच्या पादुकांना भीमा स्नान (video)

अनुराधा कोरवी

कौठाळी; सोमा लोहार : पंढरपूरच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पैठण येथून येणाऱ्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळा व साडे येथून येणाऱ्या संत बलभीम बाबा सोहळ्यातील वारकऱ्यांनी केलेल्या "भानुदास एकनाथ"च्या जयघोषाने अवघा भीमातीराचा आसमंत दुमदुमून गेला.

पंढरीच्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक संतांच्या पालख्या येत असतात. यामध्ये प्रामुख्याने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या पायी वारी करीत आहेत. त्याचबरोबर मानाच्या पालख्यापैकी पैठण येथून येणाऱ्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पायी वारी करीत आहे. सुमारे साडेतीनशे वर्षाहून अधिक वर्षाची पायी पालखी सोहळा परंपरा सुरू आहे.

या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास २५ हजाराहून अधिक वारकरी पायी वारी करीत आहेत. नाथांच्या रथासमोर पाच दिंड्या तर रथाच्या पाठीमागे ३० जिल्ह्यातील वारकरी आहेत. तर संत बलभीम बाबा या पालखी सोहळ्याला अनेक वर्षाची परंपरा असून यामध्ये पाच हजारांहून अधिक वारकरी पायी वारी करीत आहे. होळे मुक्काम आटोपल्यानंतर संत एकनाथांच्या पालखीने भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या नाथसेतुजवळ आगमन झाले. संत एकनाथांच्या पादुकांना भीमा नदीमध्ये विधिवत पूजा करून भीमा स्नान घालण्यात आले. त्यानंतर चंद्रभागेच्या किनारी आरती होऊन पालखीने प्रस्थान केले.

यावेळी होळे ग्रामस्थांच्यावतीने नदीपात्रात शेजारी पादुकांना स्नान घालण्यासाठी विशेष सोय करण्यात आली होती. परंपरागत होडी चालक चंद्रकांत नगरे यांच्या होडीमध्ये मानाचे वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, मृदंग यांना घेऊन भीमा नदीपत्रात प्रदक्षिणा घालण्यात आली. नाथांच्या पादुकांना नदी तीरावर भीमा स्नान घालण्यात आले. त्याचबरोबर कौठाळी ग्रामपंचायतच्या वतीने नाथ सेतूवरती आकर्षक रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली. नाथ सेतूवर कौठाळी ग्रामस्थांच्यावतीने संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. दोन्ही गावच्या स्वागताने पालखी सोहळ्यातील वैष्णव जन भारावून गेले.

याप्रसंगी कौठाळीचे सरपंच अनिल नागटिळक, उपसरपंच रामदास नागटिळक, माजी सरपंच मोहन नागटिळक, महादेव गाढवे, मोहन दादा पाटील, ग्रामसेविका सगुना सरवदे, नामदेव लेंडवे, पोलीस पाटील श्रीकांत नागटिळक, ग्रा. पं. सदस्य अरुण नागटिळक धोंडीराम वाघमोडे, सोमनाथ लोखंडे, होळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुहास गुराडे, गोरख पाटील, विकास नागटिळक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर संत एकनाथांची पालखी महादेव मंदिरात तर संत बलभीम बाबांची पालखी हनुमान मंदिरात विसावले. आरोग्य विभागाच्या वतीने दोन्ही पालख्यांच्या सोहळ्यामधील वारकऱ्यांना मोफत औषध उपचार करण्यात आले. दोन्ही पालखी सोहळ्यातील भाविकांना ग्रामपंचायतच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

संत एकनाथांच्या पालखीला शासनाने सुविधा द्याव्यात : रघुनाथ बुवा गोसावी

आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराज पालखी सोहळा मानाचा असून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा तीन नंबरचा मानाचा असून यासाठी शासनाने अधिकच दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे. या पालखी सोहळ्यासोबत सोयीसुविधा कमी पडत आहेत. अनेक ठिकाणी पालखी मार्गाचे काम अर्धवट राहिल्यामुळे सोहळ्यातील भाविकांना पायी वारी करीत असताना त्रास होत आहे. पालखी मार्गावर रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे असून त्या मार्गावरून पालखीचा रथ नेताना मोठी कसरत करावी लागत आहे.

भीमा नदी पात्राच्या शेजारी भीमा स्थान घालण्यासाठी शासनाने तातडीने घाट बांधावा, पालखी पंढरपुरात प्रवेश करतेवेळी अनेक अडचणी निर्माण होतात. एकादशी दिवशी संत एकनाथांच्या मानाच्या पालखीला व गोपाळपुर ऐवजी श्री. विठ्ठल मंदिरात काला करण्याचा मान सुरू ठेवावा. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आरोग्य सुविधा पोलीस बंदोबस्त मिळतो. परंतु, प्रस्थानापासून या सुविधा मिळाव्यात अशा अनेक समस्या पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांनी 'दैनिक पुढारी' शी बोलताना सांगितल्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT