Latest

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ‘व्हेरी गुड’ श्रेणीत, भारतात तीन हजार १६७ वाघांची नाेंद

Arun Patil

कोल्हापूर, सागर यादव : पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असणार्‍या वाघाच्या संरक्षणासाठी पश्चिम घाटात सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने 'फेअर', 'गुड'नंतर आता 'व्हेरी गुड' श्रेणी मिळविली आहे. व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची नोंद खूप चांगले या श्रेणीत झाली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कामगिरी उंचावली आहे.

देशातील व्याघ्र प्रकल्पाचे चार वर्षांतून एकदा मूल्यांकन होते. आययूसीएन या जागतिक संस्थेच्या मानकानुसार केंद्र सरकारमार्फत देशातील व्याघ्र संवर्धनात काम केलेल्या अनुभवी तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची परिणामकारकता मूल्यांकन (मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन – एमईई) अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

37 वरून 27 व्या स्थानावर

2018 च्या मूल्यांकनात हा प्रकल्प 37 व्या स्थानावर होता. गेल्या तीन वर्षांत क्षेत्रीय व्यवस्थापनातील परिणामकारक बदलामुळे या प्रकल्पाने very Good श्रेणीमध्ये स्थान मिळवले आहे. 51 व्याघ्र प्रकल्पात हा प्रकल्प 27 व्या स्थानावर आला आहे. सध्या रहिवासी वाघ नसले तरी दक्षिणेकडून वाघांची ये-जा सुरू असते. रानकुत्री, बिबटे, अस्वल हे शिकारी प्राणी व गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर या भक्ष्य प्राण्यांची संख्याही वाढली आहे.

नुकतेच म्हैसूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'व्याघ्र प्रकल्पाची 50 वर्षे' या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात तीन हजार 167 वाघ आहेत.

चंदगड-राधानगरी-आंबा पट्ट्यातही वाघांचा वावर

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील चंदगड, राधानगरी, आंबा या पट्ट्यात तब्बल 8 हून अधिक मोठ्या वाघांचा वावर असल्याची माहिती एन. एस. लडकत यांनी दिली. या परिसरातील 500 ते 600 कॅमेर्‍यांमध्ये महिनाभरातील नोंदीवरून हा निष्कर्ष काढल्याचे त्यांनी सांगितले.

परिणामकारक व्यवस्थापन कामे

तृणभक्ष्यी प्राणी विकास कार्यक्रमांतर्गत व्याघ्र प्रकल्पात चितळांचे यशस्वी स्थानांतर करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून वाघांच्या स्थानांतराचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. वन संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षणकुटी, निरीक्षण मनोरे, वायरलेस अद्ययावत करण्यात आले. व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर क्षेत्रामधील 200 कि.मी. पेक्षा जास्त संरक्षण रस्त्यांची निर्मिती तसेच डागडुजी करण्यात आली. वन्यजीव अधिवास विकास गवती कुरणे तयार करण्यात आली.

बफर क्षेत्रात जनजागृती

बफर क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. निसर्ग शिक्षणासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. 15 नवीन ग्राम समित्या स्थापना करून त्यांना तीन कोटी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. प्रकल्पाच्या 51 गावात 100 टक्के कुटुंबांना एलपीजी सिलिंडर देण्यात आला आहे. उर्वरित 8 गावांत पुनर्वसन प्रक्रिया राबविली जाणार आहे. निसर्ग पर्यटनाचा आराखडा राबविण्यात येणार आहे.

भारतात तीन हजार 167 वाघांची नोंद

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 2010 मध्ये झाल्यापासून 2010, 2014, 2018 मध्ये झालेल्या मूल्यांकनात या प्रकल्पांनी फेअर व गुड या श्रेणी मिळविल्या होत्या. या वर्षीच्या अहवालात आतापर्यंत प्रथमच या प्रकल्पांना 'व्हेरी गुड' श्रेणी मिळाली आहे. या श्रेणीत देशातील 20 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामध्ये ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, काझीरंगा, कॉर्बेट, सुंदरबन, पन्ना, बांधवगढ या प्रकल्पांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT