Latest

Sachin Dhas : U-19 वर्ल्डकपमध्ये बीडच्या ‘सचिन’चा प्रतिस्पर्ध्याना ‘धस’का!

रणजित गायकवाड

बीड, पुढारी वृत्तसेवा : 'सचिनने क्रिकेटमध्येच करिअर करावे असे मला प्रारंभापासूनच वाटायचे. मी सचिन तेंडूलकर यांचा मोठा चाहता आहे, त्यामुळेच माझ्या मुलाचे नाव मी सचिन ठेवले. आता त्याच नावाची जादू अनुभवत आहोत. आमच्या सचिनला महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांची सावली तरी होता आले तरी ते आमच्यासाठी खूप मोठे असेल,' अशी भावना वडील संजय धस यांनी व्यक्त केली.

बीडचा भूमिपुत्र सचिन धस (Sachin Dhas) याने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षाखालील विश्‍वचषकाच्या सेमी फायनलमध्ये 96 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामुळे संघ विजयी होत अंतिम सामन्यात पोहचला. यानंतर सचिन याच्यासह त्याच्या आई-वडीलांवर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होतोय. या पार्श्‍वभूमीवर त्याचे आई वडील सुरेखा व संजय धस यांच्याशी दै. 'पुढारी'ने संवाद साधला.

यावेळी संजय धस म्हणाले, 'बालपणापासूनच आम्ही सचिनला (Sachin Dhas) क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याने क्रिकेटपटूच बनावे असे मला प्रारंभापासून वाटायचे. त्यालाही क्रिकेटची आवड होतीच, पण त्याचवेळी सचिननेही मेहनत घेतली. त्याचेच यश सध्या पहायला मिळत आहे, ज्याचा आनंद आहे, असे त्यांनी व्यक्त केले.

आई सुरेखा धस यांना मात्र सचिनने अभ्यास सांभाळून क्रिकेट खेळावे असे वाटायचे. परंतु क्रिकेट प्रॅक्टीसचे शेड्युल हे सहा ते सात तासाचे असायचे, यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. पण सचिनच्या यश-अपयशाची जबाबदारी त्याचे वडील संजय धस यांनी घेतली होती. त्यामुळे सुरेखा धस यांनीही पुढे क्रिकेटसाठी प्रोत्साहनच दिले, यामुळेच सचिन आज देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. यापुढेही त्याने असेच देशासाठी खेळून यश मिळवावे अशी अपेक्षा धस कुटुंबीयांनी व्यक्त केली.

वयाच्या चौथ्या वर्षीच हाती धरली बॅट (Sachin Dhas)

सचिनला त्याचे वडील संजय धस यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच क्रिकेट खेळायला शिकवले. तिथून पुढे अजहर सरांकडे त्याने क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी सुरुवात केली.

जर्सी नंबर 10!

सचिन तेंडुलकर हे 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून क्रिकेटच्या मैदानात उतरत असत. क्रिकेटमध्ये त्यांनी या क्रमांकाला आपल्या अतुलनीय खेळाच्या माध्यमातून अजरामर केले. सचिन धसलाही याच क्रमांकाच्या जर्सीचे आकर्षण राहिले. त्यामुळे त्यानेही स्वतःसाठी 10 क्रमांकाची जर्सी निवडली. अगदी त्याचा मोबाईल क्रमांक, गाडीचा क्रमांक देखील दहाच असल्याचे त्याचे वडील संजय धस यांनी अभिमानाने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT