Latest

SA vs IND : भारत-द. आफ्रिका यांच्यात आज दुसरी वन-डे

Arun Patil

क्वेबर्हा : वृत्तसंस्था : भारतीय संघ आज यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA vs IND) दुसर्‍या वन-डे लढतीत मालिका विजय संपादन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. रजत पाटीदार किंवा रिंकू यांच्यापैकी एका खेळाडूला येथे वन-डे पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता ठळक चर्चेत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही लढत सायंकाळी 4.30 वाजता खेळवली जाईल.

यापूर्वी, पहिल्या वन-डे लढतीत अर्शदीप सिंग व आवेश खान या युवा जलद गोलंदाजांनी भेदक मारा साकारल्यानंतर भारताने 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. आता तोच धडाका येथे दुसर्‍या लढतीतही कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या डावखुर्‍या रिंकू सिंगच्या फलंदाजी शैलीला उनकूल मानल्या जातात. त्यामुळे त्याच्याकडून धडाकेबाज खेळीची अपेक्षा केली जाते आहे. (SA vs IND)

भारतीय संघ व्यवस्थापनाने काही ठरावीक खेळाडूंसाठी ठरावीक जागा जवळपास निश्चित केल्या असून, याचाच एक भाग म्हणून रिंकूला सहाव्या स्थानी आजमावून पाहिले जाईल, असे संकेत आहेत. सध्या सहाव्या स्थानी संजू सॅमसनला प्रथम प्राधान्य दिले जाते आहे. 30 वर्षीय रजत पाटीदारला चौथ्या स्थानावरील स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून ओळखले जाते.

रिंकूने 'लिस्ट ए क्रिकेट'मध्ये जवळपास 50 ची सरासरी नोंदवली आहे. यामुळे त्याला प्राधान्य मिळू शकते. याचवेळी रिंकू व पाटीदार यांना एकाचवेळी संधी मिळण्याची शक्यताही नाकारत येत नाही; पण तसे झाल्यास तिलक वर्माला राखीव खेळाडूत बसावे लागू शकते. या मालिकेतील सलामी लढतीत डावखुर्‍या बी. साई सुदर्शनने शानदार अर्धशतक झळकावत छोटीशी चुणूक दाखवली होती. त्यामुळे येथे तो पुन्हा एकदा आकर्षण केंद्र ठरू शकतो. (SA vs IND)

गोलंदाजीच्या आघाडीवर अर्शदीप व आवेश यांना उत्तम सूर सापडल्याने फारसे चिंतेचे कारण नाही, असे चित्र आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा अक्षर पटेल व कुलदीप यादवकडे असेल, असे संकेत आहेत.

संभाव्य संघ

भारत : के. एल. राहुल कर्णधार व यष्टिरक्षक, ऋतुराज गायकवाड, बी. साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, रिंकू सिंग, आकाश दीप, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम कर्णधार, ओटनेल बार्टमन, नँद्रे बर्गर, टोनी जॉर्जी, रिझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, माँगवाना, वियान मल्डर, फेहलुक्वायो, रॅस्सी व्हॅन डेर डुसेन, तबरेझ शम्सी, लिझाड विल्यम्स, काईल वेरेन.

सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : सायं. 4.30 पासून.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT