Latest

Alexei Navalny | पुतिन यांचे कट्टर विरोधक नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू, विषप्रयोगाचा संशय?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : रशियातील विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवालनी (Alexei Navalny) यांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला आहे. तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ॲलेक्सी नवालनी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रमुख टीकाकार म्हणून ओळखले जात होते. ते १९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते. ज्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती ती घटना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे.

पुतिन यांचे विरोधक असलेल्या ॲलेक्सी नवालनी यांना गेल्या वर्षी आर्क्टिक सर्कल तुरुंगात हलवण्यात आले होते. रशियामधील सर्वात कठोर तुरुंगांमध्ये याची गणना केली जाते. दरम्यान, नवलनी यांच्या पत्नीने तुरुंगात झालेल्या पतीच्या मृत्यूला पुतिन यांना जबाबदार धरले आहे.

रशियन न्यूज एजन्सी तासच्या वृत्तानुसार, ॲलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ॲलेक्सी नवालनी यांचे वकील लिओनिद सोलोव्योव यांनी याबाबत प्रसारमाध्यमाशी सध्या यावर भाष्य करणार नसल्याचे म्हटले आहे. पण रशियाच्या तुरुंग प्रशासन सेवेच्या अहवालात, आर्क्टिक कॉलनीत चालत असताना नवलनी बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

ज्यो बायडेन यांचा पुतिन यांना इशारा

अमेरिकेने रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्सी नवालनी यांच्या मृत्यूला व्लादिमीर पुतीन यांना जबाबदार धरले आहे. "पुतीन यांच्या क्रूरतेचा आणखी एक पुरावा" अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुतिन यांच्यावर निशाणा साधला आहे.

ॲलेक्सी नवालनी कोण होते? (Alexei Navalny)

ॲलेक्सी नवालनी हे पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्यांनी अनेक मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणून रशियातील लोकांचे लक्ष वेधले होते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांचा यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेला एक व्हिडिओ १०० कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला. रशियातील सर्वात मोठा राजकीय पक्ष पुतिन यांच्या युनायटेड रशियाला चोरांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी अनेकवेळा केला होता.

१९७६ मध्ये जन्मलेल्या नवालनी यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि एक यशस्वी वकील म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. पण २००८ मध्ये त्यांनी एक ब्लॉग लिहित सरकारी कंपन्यांचे घोटाळे उघड समोर आणले. या एका ब्लॉगमुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली. यामुळे अनेक नेते आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही राजीनामे द्यावे लागले. २०११ मध्ये सरकारच्या विरोधात ब्लॉग लिहिल्याबद्दल आणि रशियन संसद डूमाच्या बाहेर सरकारविरोधी निर्देशने केल्याबद्दल नवलनी यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले. त्यांना २०११ मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली आणि १५ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, सरकारविरोधातील मोहिमेत त्यांनी माघार न घेता सोशल मीडियाचीही आधार घेतला.

२०१२ मध्ये सत्ता मिळवत पुतिन पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष झाले. यानंतर २०१३ मध्ये नवालनी यांनी मॉस्कोच्या महापौरपदाची निवडणूक लढवली. पण पुतिन समर्थक सर्गेई सोब्यानिन यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे त्यांना सरकारी माध्यमांमध्ये दाखवण्यावर बंदी घालण्यात आली होती.

नर्व्ह एजंट नोविचोक विषप्रयोग

ऑगस्ट २०२० मध्ये नवालनी सायबेरियाच्या दौऱ्यावर होते आणि ते आणखी एक तपास अहवालाच्या तयारीत होते. येथील स्थानिक निवडणुकीत ते विरोधी उमेदवारांचा प्रचारही करत होते. याच दरम्यान त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. ॲलेक्सी सायबेरियाहून विमानाने प्रवास करत असताना अचानक आजारी पडले होते. यावेळी ते थोडक्यात बचावले होते. नंतर त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले. त्यांना रशियन बनावटीचे नर्व्ह एजंट नोविचोक विष दिल्याचे निष्पन्न झाले होते. नोविचोक हे २०१८ मध्ये चर्चेत आले होते जेव्हा माजी रशियाचे गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल आणि ब्रिटनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीवर प्रयोग झाला होता. रशियानेही त्यावेळी यात त्यांचा हात नसल्याचे म्हटले होते. त्यांनी नवालनीच्या बाबतीतही हात झटकले आहेत. नवलनी यांनी रशियन गुप्तचर संस्थांवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला होता. एका वृत्तानुसार, त्यांनी रशियाची गुप्तचर संस्था एफएसबीच्या एजंटला आमिष दाखवून हल्ल्याची माहितीही गोळा केली होती.

रशियाला परतणे सुरक्षित नव्हते

रशियाला परतणे त्याच्यासाठी सुरक्षित नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. पण नवलनी यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि त्यांनी स्पष्ट केले होते की त्यांना राजकीय प्रवासी व्हायला आवडणार नाही. त्यानंतर ते बर्लिनहून मॉस्कोला परतले होते. त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT