Latest

Russia-Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्यानं चक्क ट्रॅक्टरनं रशियन रणगाडाच पळवला (video)

backup backup

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मागच्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा सगळ्या जगावर परिणाम होताना दिसत आहे. रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर लष्करी कारवाई केल्याने युक्रेनच्या शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. किव्हसह युक्रेनच्या कित्येक शहरात रशियन फौजांनी हल्ला करत घरे जमीनदोस्त केली. (Russia-Ukraine War)

दरम्यान, युक्रेनचे नागरीक आपल्या देशाला वाचवण्यासाठी बऱ्याच युक्त्यांचा वापर करत आहेत. समोर आलेल्या अनेक व्हिडिओमध्ये युक्रेनचे लोक रशियाशी लढण्यासाठी कसे सज्ज झाले आहेत हे दिसून आले आहे. याचदरम्यान आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात युक्रेनचा एक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरनं रशियन रणगाडा पळवून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रियातील युक्रेनचे राजदूत अलेक्झांडर शेरबा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक युक्रेनियन शेतकरी आपल्या ट्रॅक्टरनं रशियन रणगाड्याला घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना शेरबा म्हणाले की, जगात पहिला हा शेतकरी असेल त्याच्याकडे चोरलेला रणगाडा असेल. याबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Russia-Ukraine War : युक्रेन सीमेवरून रशियन फौजांनी माघार घ्यावी

रशियाकडून युद्धाच्या सहाव्या दिवशीही युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. युद्ध संपुष्टात यावे म्हणून दोन्ही देश बेलारूस या शेजारी देशात चर्चा करत आहेत. चर्चेतून काही चांगले बाहेर येईल, असे वाटत नाही. पण शांततेसाठी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असेच या बैठकीकडे मी पाहतो आहे, असे चर्चेपूर्वी युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले.

युक्रेन सीमेवरून रशियन फौजांनी माघार घ्यावी, अशी मागणी चर्चेपूर्वीच झेलेन्स्की यांनी केली आहे. दुसरीकडे बेलारूसही रशियन लष्कराच्या मदतीसाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्याच्या तयारीला लागला आहे.

लॅटव्हिया या युरोपियन देशाने आपल्या नागरिकांना युक्रेनच्या बाजूने युद्धात सहभाग घेण्याची खुली सूट दिली आहे. तसा प्रस्तावच लॅटव्हियाने संसदेत पारित केला आहे. झेलेन्स्की यांनी जगभरातील लोकांना रशियाविरुद्धच्या या युद्धात युक्रेनच्या बाजूने लष्करात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आजवर रशियाच्या 5 हजार 300 सैनिकांचा खात्मा आम्ही केला आहे. 151 रशियन रणगाडे, 29 विमाने आणि 29 हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त केले आहेत, असा दावा युक्रेन लष्कराकडून करण्यात आला आहे.

Russia-Ukraine War : युक्रेनच्या 354 जणांचा युद्धात मृत्यू; 1684 जायबंदी

रशियन हल्ल्यांत युक्रेनियन सैनिकांसह 354 लोक मरण पावले आहेत. सोळा मुलांचा मृतांत समावेश आहे. 1,684 लोक जखमी आहेत, असे युक्रेनकडून सांगण्यात आले.

युक्रेनला एकटे पडू देणार नाही : संयुक्त राष्ट्रे

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत बहुतांश सदस्य राष्ट्रांनी रशियाविरुद्ध भूमिका घेतल्या आहेत आणि रशियाने तातडीने युद्धबंदी करावी, अशी मागणी केली. युक्रेनला आम्ही एकटे पडू देणार नाही. मानवी पातळीवर सर्व प्रकारची मदत युक्रेनला केली जाईल, असे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले.

रशियाकडूनही हवाई हद्दबंदी

युरोप, अमेरिकेतील 42 देशांनी रशियासाठी आपापली हवाई हद्द प्रतिबंधित केली आहे. त्याला उत्तर म्हणून रशियाने कॅनडा आणि युरोपातील देशांसह 36 देशांच्या विमान वाहतूक कंपन्यांसाठी आपल्या (रशियाच्या) हवाई हद्दीच्या वापरावर बंदी घातली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT