Latest

Russia-Ukraine crisis : यूक्रेनच्या युद्धभूमीतून 219 विद्यार्थी मुंबईत

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे पहिले विमान शनिवारी रात्री 7 वाजून 55 मिनिटांनी 219 विध्यार्थ्यांसह मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. रुमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाच्या विशेष विमानाने पहिल्या टप्प्यात देशातील विविध राज्यांतील हे विद्यार्थी मुंबईत उतरताच मायभूमीत परतल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.

यूक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू आहे. बॉम्ब हल्ला सुरू आहे. शेकडो सैनिक मारले गेले आहेत. घर, पायभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या. या अशा भयाण परिस्थितीमध्ये आपला मुलगा, मुलगी अडकले आहेत, 10-12 किलोमीटर उपाशी पायी चालत येत आहेत. या विचाराने व्याकूळ झालेले पालक संध्याकाळपासून डोळ्यात तेल घालून विमाळतळावर वाट पाहात होते.

मुंबई, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसह सर्वच नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाकडून यापूर्वी तीन विमाने पाठविण्यात येणार होती. त्यातील एक विमान युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी दिल्लीत आले. पण दुसर्‍या विमानाला युद्धजन्य स्थितीमुळे युक्रेनच्या विमानतळावर उतरता आले नाही.

रोमानिया आणि हंगेरी मार्गे या विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने विद्यार्थ्यांना रुमानिया सीमा गाठण्याच्या सूचना केल्या. सीमेवरून त्यांना बुखारेस्ट या विमानतळावर आणले गेले. तेथून विमानाने मुंबईत आणले. एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी दुपारी रोमानियातून उड्डाण घेतले आणि शनिवारी ते मुंबईत दाखल झाले आणि मायभूमीवर पाऊल ठेवताच ही मुले भावव्याकुळ झाली.

पुन्हा जाणारच : आर्या

कोल्हापूरच्या गंगावेश येथील आर्या दोन महिन्यांपूर्वी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेली. आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथे फार युद्धजन्य स्थिती नव्हती. तिथल्या स्थानिक प्रशासनाने आम्हाला रुमानिया सीमेपर्यंत बस करून दिली. रुमनियातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. पण युक्रेनमधील नागरिक खूप घाबरलेले आहेत. ते स्वतः देश सोडून जात आहेत. भारतीय दूतावासाने पूर्ण सोय निःशुल्क केली. पुन्हा युक्रेनला जाणारच अशी भावना तिने व्यक्त केली. आजची रात्र मुंबईतील नातेवाइकाकडे काढणार आणि उद्या कोल्हापूरला जाणार, असे ती म्हणाली.

बहीण आली, भाऊ मागेच

गोरेगावचे हर्षद व सीमा रणशेवरे यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. मुलगी कश्मिरा ही दोन वर्षांपासून (ालली 2 पव ूशरी) तिथे आहे. तर मुलगा आदित्य तीन महिन्यांपूर्वी (चइइड 1 ीीं ूशरी ) करीता गेला आहे. मुलगी कशीबशी रुमानिया सीमेवर पोहोचल्याने विमानाने येऊ शकली. पण मुलगा कसा येणार याची चिंता रणशेवरे कुटुंबाला आहे. मुलगा 20 किमी पायपीट करीत पोलंड सीमेवर पोहोचला, असे त्यांना फोनवरून समजले, पण पुढे काय ? या काळजीने आई सीमा या कासावीस झाल्या आहेत, तर वडील धीराने घेताना दिसले. रणशेवरे आजी देखील आपल्या नातीला घ्यायला विमानतळावर आल्या होत्या.

दुसर्‍यांदा संकट

प्रथमेश अग्रवाल एमबीबीएस तिसर्‍या वर्षाचे शिक्षण युक्रेनमध्ये घेत आहे. तो कल्याणला राहणारा आहे. प्रथमेशला यापूर्वी कोरोनामध्ये अशा पद्धतीने घरी यावे लागले होते. प्रथमेशने रात्रभर दहा किमी पायपीट करून रुमानियाची सीमा गाढली. प्रथमेश जेव्हा विमानतळा वरून बाहेर आला त्यावेळी त्याची आई पूजा हिने एकच धाव घेतली आणि आपल्या लेकाला मिठी मारली.

खार्किव्हमध्ये अडकलेत सुमारे अडीच हजार भारतीय

खार्किव्ह शहरात सुमारे अडीच हजारांवर भारतीय विद्यार्थी व नागरिक अडकले आहेत. भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, त्याकरिता रोमानिया देशात जावे लागते आणि रोमानिया खार्किव्ह शहरापासून 500 किलोमीटर दूर आहे. यामुळे अद्याप तरी खार्किव्हमधून भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

जीव मुठीत धरून बसलोय!

कोल्हापूर : 'होय… जीव मुठीत धरूनच आम्ही बसलोय! खार्कीव्ह येथील मुख्य मेट्रो स्थानकाच्या बंकरमध्ये गुरुवारी दुपारी शिरलोय, ते अजूनही तिथेच आहे. बाहेर जाताच येत नाही, आता थांबलेली 'मेट्रो'च घर झालीय आणि आश्रयाला असलेलेच आता एकमेकांचे कुटुंब झालेय. बाहेर पडण्याची वाट पाहतोय…' ही कहाणी आहे, युक्रेनमध्ये अडकलेल्या कराड येथील अवधूत श्रीकांत पाटील याची. अवधूतसह सुमारे 100 भारतीयांसह 700 ते 800 युक्रेन नागरिकही या बंकरमध्ये थांबले आहेत.

SCROLL FOR NEXT