Latest

Russia-Ukraine crisis : बॉम्बहल्‍ले अन् बंकरमध्ये जीव मुठीत

Arun Patil

भिवंडी ; संजय भोईर : 72 तासांपासून डोळ्याला डोळा नाही. रात्रभर बंकरमध्ये विमानांचा घोंगावणारा आवाज… मिसाईल आणि बॉम्बच्या वर्षावाने पाचावर धारण बसली होती… मायदेशी सुखरूप पोहोचू की नाही, हा एकच प्रश्‍न सतावत होता. युक्रेन-रशिया (Russia-Ukraine crisis) युद्धादरम्यानचे हे थरारक अनुभव सांगितले आहेत, भिवंडी तालुक्यातील पडघा येथील मुस्कान फिरोज शेख हिने.

युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुस्कानशी 'पुढारी'ने संपर्क साधला, रशियाच्या आक्रमणातून लोक कसे जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत, याचे अंगावर काटा आणणारे अनुभव तिने सांगितले. दिवसा हवाईहल्ले होत नसल्याने बंकरबाहेर येऊन जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ घेण्याचा प्रयत्न असतो. आम्ही अडकून पडलेल्या परिसरात एकच दुकान, तिथला ब्रेडचा साठा संपल्याने सर्वांना फारसे काही मिळतच नाही. फक्त ब्रेड आणि पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. बंकर्सपासून 10 किलोमीटर अंतरावर बॉम्बहल्ले सुरू असल्याचे ती म्हणाली. (Russia-Ukraine crisis)

एक मिनिटाचा सायरन झाला, की बंकरमध्ये-बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याच्या आणि 30 सेकंदांचा अलार्म वाजल्यावर बाहेर येण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. सायंकाळी 5 वाजता इमर्जन्सी अलार्म वाजल्यानंतर रात्रभर आणि सकाळी 8 वाजेपर्यंत बंकरमध्ये राहावे लागते, असे मुस्कानने सांगितले. बंकर कुठे आहेत तेे कळत नाही; त्याबद्दलची माहिती कुणी देत नाही. त्यामुळे गुगल मॅपचा आधार घेऊन बंकर शोधावे लागतात, असे ती म्हणाली.

आतापर्यंत वृत्तवाहिन्यांंवरून पाहिलेल्या युद्धाचा थरारक अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही घेत आहोत. आम्हाला येथून लवकरात लवकर बाहेर काढा.आम्हाला मायदेशी परतायचे आहे, अशी मदतीसाठीची हाक मुस्काननसह इतर विद्यार्थ्यांनी भारताला दिली आहे.

प्रवेशासाठी गेलेला प्रतीक अडकून पडला (Russia-Ukraine crisis)

भिवंडीतील संतोष चव्हाण यांचा मुलगा प्रतीक युक्रेनमधील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला होता. संबंधित एजन्सीने 21 फेब्रुवारीला प्रत्यक्ष परीक्षा असल्याने युक्रेनला जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. परंतु, तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रतीकचे आईवडील त्याला पाठवण्यास तयार नव्हते.

याच परिस्थितीत प्रतीकसह 28 विद्यार्थी युक्रेनला गेले. 23 फेबु्रवारीला तेथे परीक्षा देत असतानाच त्यांना युद्ध सुरू झाल्याचे समजले. त्यानंतर या सर्वांना हॉस्टेलमध्ये थांबण्यास व फक्त गरजेपुरत्या साहित्यासह तयार राहण्यास सांगण्यात आले. प्रतीक युक्रेनमध्ये अडकल्यामुळे त्याचे आईवडील प्रचंड तणावाखाली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT