मॉस्को/कीव्ह ; वृत्तसंस्था : युक्रेन (Russia-Ukraine conflict) सीमेवर चकमकी सुरू आहेतच, त्यासह युक्रेनच्या रशियन लष्कराने ताब्यात घेतलेल्या डोनेट्स्क भागातही चकमकींचे प्रमाण वाढलेले आहे. लुहान्स्कमध्येही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. आता बंडखोरांच्या (रशिया समर्थक) ताब्यात नसलेल्या भागांवरही रशियन फौजा चढाई करणार आहेत. रशियन लष्कराने तसे अधिकृतपणे जाहीर केल्याने या एकूणच भागांतील हजारो युक्रेनियन रहिवासी आपापले किडूकमिडूक आवरून देशाच्या पश्चिम भागाकडे निघाले आहेत.
समाजमाध्यमांतून युक्रेनमध्ये शिरत असलेल्या रणगाड्यांच्या व्हायरल होत असलेल्या दृश्यांनी युक्रेनियन रहिवाशांना धडकी भरवलेली आहे. पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत डोनेट्स्क, लुहान्स्कचा एक तृतीयांश भाग रशिया समर्थक बंडखोरांच्या ताब्यात आहे. उर्वरित भाग युक्रेनच्याच नियंत्रणाखाली आहे. आता रशियाच्या फौजा या भागांतही घुसणार म्हटल्यावर मोठा संघर्ष होईल, असे मानले जात आहे. सामरिक बळाची तुलना केली असता, रशिया युक्रेनपेक्षा किती तरी पटीने वरचढ आहे.
युक्रेनमधील पूर्वेकडील बंडखोरांच्या प्रत्यक्ष ताब्यात नसलेल्या भागांवरही रशियन फौजा आपला कब्जा जमविण्यात यशस्वी होतील, असेही मानले जाते. अर्थात, युक्रेनकडूनही मजबूत तटबंदी करण्यात आली आहे. 451 किलोमीटर लांबीच्या संपर्क रेषेवर भूसुरुंग पेरण्यात आले आहेत. मोर्चेबंदीही केली आहे.
तथापि, ती सर्व मोडीत काढून रशिया हवाईदल तसेच नौसेनेचा वापर करून या भागांवर कब्जा जमवू शकते, असेही सामरिक तज्ज्ञांना वाटते. अर्थात, रशियाने तसे उघडउघड जाहीरच केले आहे. थोडक्यात, पूर्व युक्रेन दीर्घकाळ युद्धाच्या खाईत लोटला जाईल. युद्ध कधी संपुष्टात येईल, हे आता सांगता येणार नाही.
युक्रेनमध्ये आणीबाणी
युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. ही परिस्थिती 30 दिवसांपर्यंत लागू राहील. गरज भासल्यास आणखी 30 दिवसांची वाढ केली जाईल.
पुतीनना निर्णयाचे सर्वाधिकार
रशिया-युक्रेन संघर्षाच्या (Russia-Ukraine conflict) पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कुठलाही अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना असल्याचे आवर्जून स्पष्ट करण्यात आले.
दबावाखाली येणार नाही : पुतीन
युक्रेनमधील दोन राज्ये स्वतंत्र देश म्हणून जाहीर केल्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे पहिलेच वक्तव्य समोर आले आहे. पुतीन म्हणाले की, आम्ही चर्चा करू इच्छित नाही, असे कधीही म्हणालेलो नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय हितांशी कुठल्याही प्रकारची तडजोड कुठल्याही दबावाखाली करणार नाही, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे.
पुतीन यांनी देशाला उद्देशून तसा व्हिडीओ मेसेज जारी केला आहे. जग विचित्र होत चालले आहे. एकीकडे शस्त्रास्त्र कपातीची गोष्ट केली जाते, तर दुसरीकडे नाटो फौजांचा विस्तार आणि सशक्तीकरण चाललेलेच आहे. आमचे म्हणणे आहे की, जागतिक सुरक्षा व्यवस्था संतुलित असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक देश स्वत:च्या हितांचे संरक्षण करू शकेल.
संकटसमयी आम्ही सारे एक : जेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लोदिमीर जेलेन्स्की यांनीही मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, संकटाच्या या काळात देश म्हणून आम्ही एक आहोत. सर्व राजकीय पक्ष युक्रेनच्या झेंड्याखाली एकवटलेले आहेत. सर्वजण निळा आणि पिवळा (युक्रेनच्या ध्वजाचे रंग) या रंगांत रंगून गेलेले आहेत. युद्धसदृश परिस्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम व्हायला नको म्हणून करांमध्ये सवलती देण्याची घोषणाही जेलेन्स्की यांनी केली आहे.
युक्रेनच्या 6 सैनिकांचा मृत्यू
रशियन सैनिक आता युक्रेनियन बंडखोरांसह युक्रेन लष्कराच्या नियंत्रणाखालील भागांच्या दिशेने निघालेले आहेत. यादरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत युक्रेनचे 6 सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.
बेलारूसमधून हल्ला?
रशियाने युक्रेनलगतच्या बेलारूस या देशात आपले लष्कर वाढविले आहे. बेलारूसच्या सीमेपासून युक्रेनची राजधानी कीव्ह केवळ 75 किलोमीटर अंतरावर आहे. रशिया येथूनच कीव्हवर हल्ला करेल, असे मानले जात आहे.
अमेरिकेची लढाऊ विमाने तैनात
रशियाचा आक्रमक पवित्रा पाहून अमेरिकेनेही या क्षेत्रात अत्याधुनिक एफ-35 लढाऊ विमाने तसेच आपाचे हेलिकॉप्टर्स तैनात करण्याचे ठरविले आहे.आठ विमाने, 32 हेलिकॉप्टर्स अॅस्टोनिया, लिथुआनिया आणि लाटविया या बाल्टिक देशांतून तैनात करण्यात येत आहेत.