नवी दिल्ली, वृत्तसंस्था : युक्रेनच्या संघर्षावरून जी-20 परिषदेत राजकारण न केल्याबाबत भारताचे कौतुक करीत रशियाने परिषदेच्या घोषणापत्राबाबतही समाधान व्यक्त केले.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरॉव यांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक करताना म्हटले की, भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-20 परिषदेत जगाला ग्लोबल साऊथची गांभीर्याने दखल घ्यावी लागली हे महत्त्वाचे आहे. भारताने आपले स्थान मजबूत करतानाच समन्वय, समंजसपणा आणि मध्यममार्गाचे दर्शन घडवले. त्यामुळेच युक्रेन संघर्षावरून जी-20 परिषदेत राजकारण होईल अशी रशियाला शंका होती, ते एका अक्षरानेही झाले नाही. घोषणापत्रातही थेट रशियाचे नाव घेतले गेले नाही याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.
जी-20 परिषदेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या विषयांवर पुढील दिशा ठरवण्यात सर्वांनाच संधी मिळाली, असे सांगून लॅव्हरोव्ह यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, प्रत्येकाला शांतता हवी आहे. पण नाटो देशांच्या आक्रमक धोरणांमुळे युक्रेनचा संघर्ष लांबत चालला आहे. 18 महिन्यांपूर्वी रशिया संघर्ष थांबवण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यास तयार होता होता. पण युरोपियन देशांनी झेलेन्स्की यांना रोखले.
जी-20 परिषदेत युरोपीय देश व अमेरिका मिळून युक्रेनच्या विषयावर टार्गेट करण्याची भीती रशियाने परिषदेआधीच व्यक्त केली होती. पण भारताने अतिशय मुत्सद्देगिरीने हा विषय हाताळल्याने जी-20 परिषदेत संघर्षाची ठिणगी पडली नाही, असे रशियाच्या वरिष्ठ अधिकार्यांचेही म्हणणे आहे.
तुर्कीयेचा भारताच्या सुरक्षा परिषद सदस्यत्वाला पाठिंबा
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्त्वाला तुर्कीयेने पाठिंबा दिला आहे. जग काही पाच देशांपुरते मर्यादित नाही. त्यामुळे भारतासारखा देश सुरक्षा परिषदेत असले तर त्याचा आम्हाला अभिमान वाटेल, असे तुर्कीयेचे अध्यक्ष तय्यीप एर्दोगान यांनी म्हटले आहे. जी-20 परिषदेसाठी आलेल्या एर्दोगान यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व दोन देशांमधील संबंधांबाबत चर्चा केली.
त्यांच्या भेटीत सुरक्षा व व्यापारविषयक अनेक विषयांना गती मिळाली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एर्दोगान यांनी भारताच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वाला पाठिंबा दिला. ते म्हणााले की. जग आता विस्तारले आहे. ते पाच देशांपुरते राहिलेले नाही. त्यामुळे भारतासारखा देश सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून आला तर आम्हाला आनंदच आहे. ते म्हणाले की, भारत हा तुर्कीयेचा द. आशियातील सर्वात मोठा व्यापार सहकारी देश आहे. आर्थिक क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करीत दोन देश आपले संबंध मजबूत करण्यावर ठाम आहेत. भारताने जी-20 परिषदेचे केलेले आयोजन व आपला व आपल्या प्रतिनिधींचा केलेला पाहुणचार उत्तम होता, असे सांगत त्यांनी भारताचे आभार मानले.